‘सहारा’ने केले महिलांना बेसहारा, खासदार गवळींकडे मागितली मदत… - sahara seeks help from helpless women ask to mp gawali for help | Politics Marathi News - Sarkarnama

‘सहारा’ने केले महिलांना बेसहारा, खासदार गवळींकडे मागितली मदत…

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

नागपूरचे व्यवस्थापक प्रशांत आंबटकर, ज्ञानेश्‍वर ठाकूर आणि यवतमाळच्या व्यवस्थापकांनी गुंतवणूकदारांना तुमचे गुंतवलेले रुपये देतो, असे सांगितले. परंतु आजपर्यंत कुठलीही गुंतवणूकधारकाची रक्कम परत दिली नाही. संबंधित अधिकारी फोन उचलत नाही, उडवाउडवीची उत्तरे देतात.

नागपूर : वर्धा मार्गावर स्वप्नवत वाटणारी सहारा सीटी गेल्या १५ ते २० वर्षांपासून आकार घेत आहे. पण अद्यापतरी हे काम पूर्ण झालेले नाही. सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडद्वारा निर्माण करण्यात येत असलेल्या या योजनेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे. पण अद्याप एकालाही घर मिळाले नाही, की त्यांची रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी जागतिक महिला दिनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 

त्यापूर्वी या महिलांनी यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्याकडे कैफियत मांडली. त्यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायला सांगून या प्रकरणात न्याय मिळवून देण्याचा विश्‍वास महिलांना दिला आहे. त्यानुसार महिलांनी ८ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीत महीला म्हणतात की, मागिल १५ ते २० वर्षांपासून सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडकडे सामान्य गोरगरीब जनता गुंतवणूक करत आली आहे. आम्हाला घरे तर मिळालीच नाहीत. पण गुंतवलेली रक्कम मागितली असता तीसुद्धा परत दिली नाही. सोसायटीकडून केवळ आश्‍वासन देण्यात आले. पण गेल्या ४ वर्षापासून एक पैसाही आम्हाला देण्यात आला नाही. 

नागपूरचे व्यवस्थापक प्रशांत आंबटकर, ज्ञानेश्‍वर ठाकूर आणि यवतमाळच्या व्यवस्थापकांनी गुंतवणूकदारांना तुमचे गुंतवलेले रुपये देतो, असे सांगितले. परंतु आजपर्यंत कुठलीही गुंतवणूकधारकाची रक्कम परत दिली नाही. संबंधित अधिकारी फोन उचलत नाही, उडवाउडवीची उत्तरे देतात. आम्ही सर्व गरीब महिला मोलमजुरी करून थोडी थोडी रक्कम सहारा ग्रुपमध्ये जमा करत आलो आहोत. आता आमच्या असे लक्षात आले आहे की, सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायची आमचे पैसे परत देणार नाहीत. त्यामुळे आम्ही खासदार भावना गवळी यांना आमची समस्या सांगितली. त्यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार द्यायला सांगितले असल्याचे दुर्गा कठाडे, गिरजा ढोके, दुर्गा कापगते, शोभा रावेकर, सुमन बावणे, रुकमा मगर आणि रमेश गिरोलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. 

हेही वाचा : अनिल बोंडे व पोलिसांमध्ये बाचाबाची; दोघेही एकमेकांना म्हणाले ''तुम्ही कुत्रे"!

एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील गुंतवणुकदारांचा विचार केला तर ही रक्कम अंदाजे ५० कोटी रुपयांच्या घरात जाते. त्यामुळे हा घोटाळा फार मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महिलांना न्याय देण्यासाठी खासदार भावना गवळी पुढे काय पावले उचलणार, यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख