रविकांत तुपकरांनी ऑन दी स्पॉट मिळवून दिला दूध उत्पादकांना न्याय

ग्रामीण भागातून बुलडाण्याकडे दूध आणणाऱ्या शेतकऱ्यांना सकाळी पोलिसांनी अडविले. त्याचप्रमाणे दूध डेअरी व संकलन केंद्रवाल्यांचीही अडवणूक करण्यात आली. आधीच मागील लॉकडाऊनमध्ये कंबरडे मोडले, यावेळीही आर्थिकदृष्ट्य़ा आपण खचून जाऊ म्हणून या सर्वांनी रविकांत तुपकरांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली.
Ravikant Tupkar on milk
Ravikant Tupkar on milk

नागपूर : गेल्या वर्षी याच काळात राज्यात कोरोनाचे आक्रमण झाले होते. आताही तीच स्थिती उद्भवली आहे. बुलडाणा जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचे आदेश पारित केले. त्यात दूध उत्पादक भरडले जाणार होते. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दूध उत्पादकांना लॉकडाऊनच्या नियमांतून सूट देण्यास जिल्हा प्रशासनाला भाग पाडले आणि जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती दूध उत्पादकांना, संकलन व वितरण केंद्रे यांना हवी असलेली सुधारित वेळ ठरवून दिली.

लॉकडाऊनचा आदेश पारित करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच गोष्टींवर निर्बंध आणले आहेत. लादलेल्या निर्बंधात मात्र दूध उत्पादक शेतकरी, दूध वितरक आणि संकलन केंद्र संचालकांची गोची करण्यात आली होती. दूध कोणत्या वेळेत निघते, त्याचे संकलन आणि विक्रीची वेळ यात संचारबंदीच्या आदेशात मोठी तफावत ठेवल्याने होणारे नुकसान पाहता रविकांत तुपकर यांनी दूध उत्पादक व विक्रेत्यांना घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी भेटून चर्चा केली. तसेच आयुक्त पीयूष सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. तुपकरांची मागणी गांभीर्याने घेऊन आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूध उत्पादक व विक्रेत्यांना सूट देण्यासंदर्भात निर्देश दिले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लॉकडाऊनचे आदेश पारित करतानाच त्यामध्ये दूध उत्पादकांना, संकलन व वितरण केंद्रे यांना दिलासा दिला.

आता सकाळी ६ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ६ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत दूध उपलब्ध राहणार आहे. म्हणजेच सकाळपासून दुपारपर्यंतचे ९ तास आणि सायंकाळचे अडीच तास त्यांना मिळणार आहेत. गायी, म्हशींपासून मिळणाऱ्या दुधावरच अनेक शेतकऱ्यांचा चरितार्थ चालतो. या शेतकऱ्यांवर दूध विक्रेते व संकलनकर्त्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. अमरावती विभागात कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता अंशत: लॉकडाऊन सुरू झाले आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू करून सर्वांसाठी नियम घालून दिले आहेत. दुग्ध व्यवसाय व दुग्धजन्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी वेळ ठरवून देण्यात आली होती. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ही बाब स्वागतार्ह असली तरी दूध उत्पादक शेतकरी व व्यावसायिकांचे यामुळे नुकसान होणार होते. दुधासंदर्भातील अडचणी आणि शेतकरी, विक्रेत्यांचे होणारे नुकसान याचा पाढाच तुपकरांनी मांडला.

प्रशासनाच्या वेळेनुसार दूध आणणे, विकणे याचा मेळ बसणे शक्यच नसल्याचे तुपकर यांनी सविस्तर लक्षात आणून दिले. तसेच लहान मुले, रुग्णांना दूध आवश्यक असल्याचेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्यासोबतही भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली. दुधाचे सकाळी ९ पर्यंतच वितरण करणे गरजेचे असते. अन्यथा ते नासते. तसेच दूध साठविण्याची व्यवस्थाही शेतकऱ्यांकडे नाही. गायी व म्हशीच्या कासेमध्ये फार काळ दूध ठेवले जात नाही. पहाटे ५ ते ७ या वेळेत आणि सायंकाळी ५ ते ७ ही वेळ दूध काढण्याची असते. त्यामुळे दुधाकरिता ६ ते रात्री १० अशी वेळ ठरवावी, अशी मागणी तुपकर यांनी केली. मागणीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांशी चर्चा करून तातडीने सुधारित आदेश काढला. त्यानुसार सकाळी ६ ते दुपारी ३ व सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत दूध विकण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची अडवणूक
ग्रामीण भागातून बुलडाण्याकडे दूध आणणाऱ्या शेतकऱ्यांना सकाळी पोलिसांनी अडविले. त्याचप्रमाणे दूध डेअरी व संकलन केंद्रवाल्यांचीही अडवणूक करण्यात आली. आधीच मागील लॉकडाऊनमध्ये कंबरडे मोडले, यावेळीही आर्थिकदृष्ट्य़ा आपण खचून जाऊ म्हणून या सर्वांनी रविकांत तुपकरांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली. तुपकर यांनीही क्षणाचा विलंब न करता काही तासांतच प्रशासनाला दुधाचा प्रश्न मार्गी लावण्यास बाध्य केले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com