नागपुरातील प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वेचे अनुकरण देशभर होईल : नितीन गडकरी

नागपूर शहरातील कामठी, खापरी, बुटीबोरी, इतवारी, कळमना या रेल्वे स्टेशनला या ब्रॉडगेज मेट्रोमध्ये मुंबईच्या लोकलप्रमाणे एकत्रीकरण करून रेल्वेची इंटर-कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी याचा उपयोग होईल, असे गडकरींनी यावेळी सांगितले.
Nitin Gadkari.
Nitin Gadkari.

नागपूर : नागपूरची मेट्रो ही स्टॅंडर्ड गेज मेट्रो आहे. भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गावर मेट्रो कोचेस चालवून नागपूर नजीक सॅटेलाइट सिटीज नागपूरला जोडणे हा प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या ब्रॉडगेज प्रकल्पामध्ये असणाऱ्या रेल्वे कोचेसची मालकी खाजगी गुंतवणुकदारांना दिल्यास ही स्थिती गुंतवणुकदार, प्रवासी, भारतीय रेल्वे महामेट्रो तसेच एमएसएमईला पूरक आणि फायदेशीर असेल. हा राज्यातील एकमेव असा पहिलाच प्रकल्प असून आर्थिक दृष्टया सक्षम असेल आणि याचे अनुकरण संपूर्ण देशात होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केले. 

महामेट्रो, केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत विकास संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ब्रॉडगेज रेल्वे मेट्रोसाठी गुंतवणुकदार मेळाव्याचे आयोजन काल स्थानिक साउथ एअरपोर्ट मेट्रो स्थानकातील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, एमएसएमई  विकास संस्थेचे संचालक  पी.एम. पार्लेवार उपस्थित होते. प्रस्तावित ब्रॉडगेज मेट्रो स्टेशनमुळे नागपूर नजीक काटोल, भंडारा, वर्धा, अमरावती, नरखेड, रामटेक, वर्धा यांसारखे सॅटॅलाइट टाऊन्स नागपूरला जोडले जातील. भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज रेल्वे लाइन वर असणारी प्लॅटफॉर्म, सिग्नल व्यवस्था आधीपासून तयार असून यावर लागणारा मेट्रोचा रोलिंग स्टॉक सदर प्रकल्पात लागणार आहे. अशा कोचेसची किंमत ही साधारणतः 30 कोटी असणार असून त्या मेट्रोच्या खरेदीसाठी केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे गुंतवणुकदारांना इंटरेस्ट सबवेंशन व  इतर अर्थसहाय्याचीसुद्धा उपलब्धता होणार आहे. 

या ब्रॉडगेज रेल्वेचा वेग हा  120 किलोमीटर प्रति तास असून यामुळे नागपूर ते अमरावती हे अंतर केवळ दीड तासात कापणे शक्य होणार आहे . ब्रॉडगेज मेट्रो मध्ये विमानाप्रमाणेच इकॉनोमी तसेच बिझनेस क्लास राहणार असून मनोरंजन, खानपान सुविधा उपलब्ध राहणार आहेत.  या मेट्रो मध्ये असणाऱ्या जाहिराती ,  खानपान आणि इतर मनोरंजनाच्या सुविधा  वस्तू विक्रीचे अधिकार हे  संबंधित  खाजगी गुंतवणुकदारांना असणार असून याचा फायदा त्यांना होणार आहे . या  मेट्रो प्रकल्पाची सुरुवात एक-दीड वर्षात होईल असे गडकरी यांनी यावेळी सांगितलं

स्टॅंडर्ड गेजची मेट्रो, ब्रॉडगेजची मेट्रो आणि नागपूरचे बस फॅसिलिटीचे एकत्रीकरण करून नागपूर शहरातील कामठी, खापरी, बुटीबोरी, इतवारी, कळमना या रेल्वे स्टेशनला या ब्रॉडगेज मेट्रोमध्ये मुंबईच्या लोकलप्रमाणे एकत्रीकरण करून रेल्वेची इंटर-कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी याचा उपयोग होईल, असे गडकरींनी यावेळी सांगितले. या कोचेसची मालकी ही प्रामुख्याने विदर्भातील उद्योजकांना देण्यात येईल, जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सदर प्रकल्पासाठी जुलै 2018 पासूनच मेट्रोने पुढाकार घेतला असून यासाठीचा सामंजस्य करार अंतिम टप्प्यात असून लवकरच तो मंजूर होणार असल्याचे सांगितले.

एमएसएमई विकास संस्था नागपूरचे संचालक पी.एम. पार्लेवार यांनी  एमएसएमई क्लस्टरच्या माध्यमातून उद्योजकांनी एकत्र येऊन ब्रॉडगेज मेट्रोचे कोचेस विकत घेण्याची संकल्पना मंत्रालयातर्फे मांडली गेली असल्याची माहिती दिली आणि या संकल्पनेला गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे  सांगितले. या मेळाव्यादरम्यान विविध बस संचालक उद्योजक आणि हीतधारकांनी त्यांच्या योजनांचे सादरीकरण केले. यावेळी गुंतवणुकदारांच्या प्रश्नांनासुद्‌धा  गडकरी यांनी उत्तरे  दिली. या कार्यक्रमाला महा मेट्रो, एमएसएमइ विकास संस्थेचे अधिकारी तसेच उद्योजक, बस उद्योगाचे संचालक उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com