आमदारांच्या बॉलवर खासदारांचा चौकार, पण नियमांचे उल्लंघन करून... - mps six on mlas ball but by violating the rules | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

आमदारांच्या बॉलवर खासदारांचा चौकार, पण नियमांचे उल्लंघन करून...

अरुण जोशी
रविवार, 28 मार्च 2021

एकीकडे राज्य शासन जिल्हा स्तरावर कोरोना कमी करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करीत आहे. नागरिकांसाठी नियम आखून देण्यात आले आहेत. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्याकडून  दंड वसूल करण्यात येत आहे. पण दुसरीकडे मात्र जिल्ह्याच्या खासदार व आमदार आणि अजूनही काही राजकीय नेते त्रिसूत्री नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे.

अमरावती : होळी हा सण प्रत्येकासाठीच आनंदाचा आणि महत्वाचा. पण आदिवासी बांधवांसाठी तो अधिक महत्वाचा आहे. येथे आठ दिवस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या ११ वर्षांपासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे सातत्याने मेळघाटात आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात. आजही हे दोघे मेळघाटातच आहेत. पण सरकारने कोरोना स्थितीत घालून दिलेल्या नियमांचे या दोघांनीही उल्लंघन केल्याचा आरोप आदिवासी बांधवांनीच त्यांच्यावर केला आहे. 

मेळघाटची कन्या दरवर्षीप्रमाणे यंदाही मेळघाटात होळीसाठी दाखल झाली. खासदार नवनीत व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात आदिवासींसोबत होळी खेळण्याची आपली गेल्या ११ वर्षापासूनची परंपरा यावर्षी कोरोनाच्या स्थितीतही जोपासली. आज मेळघाटातील गावात आदिवासी बालकांसोबत क्रिकेट खेळून या दोघांनीही मनसोक्त आनंद लुटला आणि मुलांचे मनोबल वाढविले. गावागावांत युवकांना सक्षम, सुदृढ बनविण्यासाठी त्यांची खेळाची आवड जोपासण्यासाठी क्रिकेट व व्हॉलीबॉल किटचे वाटप त्यांनी केले. यावेळी मुलांसोबत क्रिकेट खेळताना आमदार रवी हे बॉलींग करीत होते आणि खासदार बॅटींग करीत होत्या. आमदारांच्या बॉलवर खासदारांनी सुंदर चौकार खेचला आणि उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. पण हे करत असताना त्यांनी मास्क घातलेला नव्हता, सोशल डिस्टंसिंगचे कुठेही पालन केले गेले नाही. त्यामुळे काही आदिवासी बांधवांनी त्यांच्या सरकारच्या त्रिसूत्रीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. 

एकीकडे राज्य शासन जिल्हा स्तरावर कोरोना कमी करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करीत आहे. नागरिकांसाठी नियम आखून देण्यात आले आहेत. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्याकडून  दंड वसूल करण्यात येत आहे. पण दुसरीकडे मात्र जिल्ह्याच्या खासदार व आमदार आणि अजूनही काही राजकीय नेते त्रिसूत्री नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. यांच्यावर आता कोण कारवाई करणार, असा प्रश्न आदिवासी बांधव विचारू लागले आहेत. 

हेही वाचा : मेळघाटात होळीला निसर्ग, धान्य व वनाच्या पूजनाची परंपरा
आदिवासी समाजात होळी सणाला फार महत्त्व आहे. आजपासूनच संपूर्ण मेळघाटात होळी सणाला सुरुवात झाली आहे. येथून पुढील आठ दिवस हा होळी सण मेळघाटात साजरा होणार आहे. बाहेरगावी असलेले सर्व आदिवासी बांधव होळी सणाच्या पूर्वसंध्येला मेळघाटात आपल्या गावी येत असतात. होळीच्या आठ दिवसांपूर्वी घराची साफसफाई, स्वच्छता रंगरंगोटी हे आदिवासी बांधव करतात. होळी सण साजरा केल्यानंतर पुढील आठ दिवस हे आदिवासी बांधव लोकांना फगवा मागतात. आपल्या आदिवासी नृत्याने अनेक आदिवासी बांधव जनजागृती करतात.

मेळघाट हा जैवविविधतेने नटलेला भाग आहे. या भागात ८० टक्के लोक हे स्थानिक आदिवासी बांधव आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशात त्या त्या भागातील वैशिष्ट्य़ आजही कायम आहे. कोरकू आदिवासी बांधवांचा पिढ्यान्पिढ्या चालत असलेले पारंपरिक आदिवासी आजही कायम आहे. सर्व शुभ प्रसंगांमध्ये लग्नाच्या वेळी उत्सव समारंभात स्त्री-पुरुष समूहांमध्ये या नृत्याचा आनंद घेतात. प्रामुख्याने भडक बंडी, कोट, धोतर घालतात. तसेच डोक्यावर पगडी बांधून त्यात खोपा रोवला जातो. या नृत्यासाठी मुली व महिला लाल रंगाची साडी परिधान करून पारंपरिक अलंकार घालतात. होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मेळघाटच्या खोऱ्यात तयारी सुरू झाली आहे. अनेक आदिवासी पारंपरिक नृत्यांवर ताल धरत आहे.दहा दिवस चालणाऱ्या या होळी सणाची मजा काही औरच असते. पहिल्या दिवशी शेतातील पीक आणि होलिकांचे पूजन केले जाते. 

येथे वेगवेगळ्या दिवशी होळी पेटवली जाते. पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागी आदिवासी नृत्य करत असतात. मेळघाटच्या गावांमध्ये मेघनाथ स्तंभ उभारला जातो. मेघनाथ हे आदिवासी समाजाचे दैवत असल्याने त्याची पूजा केली जाते. मोह फुलापासून काढण्यात आलेली दारू सेवन करण्यासाठी दिली जाते. किणकी, ढोलकी, बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर पारंपारिक  
 
नृत्य करत असतात. पळसाच्या फुलापासून नैसर्गिक रंग खेळण्यात येतो. होळीनिमित्त मेळघाटातील काराकोठा, काटकुंभ, भरू या गावात मोठी यात्रा सुद्धा भरते. यंदा कोरोनामुळे या यात्रा होणार नाही. सातपुडा पर्वत रांगांतून वाहणाऱ्या तापी नदीला आदिवासी दैवत मानतात, पूजा करतात. घाटाचा मेळ असलेल्या मेळघाटातील आदिवासी मध्ये कोरकू, गोंड, राठीया या प्रमुख जाती अधिक प्रमाणात आहे. आदिवासींच्या सर्व जाती दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे मेळघाटातील होळी सणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या गावांमध्ये होळीची धूम
मेळघाटातील अनेक गावात होळीची धूम सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने हिरा बंबई, होळी, चिखलदरा तालुक्यातील हतरू, रायपूर,जारीदा, तारूबांदा, हरदा, खडीमल,बोराट्याखेडा या गावात होळी मोठ्या प्रमाणात साजरी होते. खाऱ्या टेंभरू गावात दरवर्षी मेघनाथची यात्रा भरत असते. परंतु यावर्षी यात्रेला फाटा बसणार आहे. याशिवाय तारा, कोट व माखला गावे पारंपारिक जहागीरदारी असणारी आहेत. त्यामुळे ही गावे आजही त्यांची परंपरा जपतात.मेळघाटात पूर्वापार रहिवासी गेल्या काही पिढ्यांपासून राज्यातील अनेक शहरात स्थायिक झाले आहेत. मात्र होळीला ते गावी परतात. त्यामुळे आदिवासी समाजातील मोठे अधिकारी, प्रगतिशील नागरिक त्यांच्या मूळ गावी जाऊन होळीचा सण साजरा करतात.

पंचमहाभूतांच्या पूजेला महत्त्व
आदिवासी बांधव हिंदू देवी,देवतांच्या पूजना सोबतच इंद्र, वरुण,सूर्य, चंद्र व पंचमहाभूतांचे पूजन करतात. मेळघाटातील जंगलात आजही त्यांच्या पूर्वजांचे अस्तित्व कायम असल्याची त्यांची धारणा आहे. कोरकू, गोंड, भिलाला, थाट्या,निहाल या जाती मेळघाटात होळी सण साजरा करण्यात अग्रक्रमावर आहेत. मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये पंचायतचे अनन्य साधारण महत्व असते.वाद, गैरसमज यातून दूर होतात. दरवर्षी होळीच्या सणात पंचायत लग्न कार्य व शेती करिता आदिवासींना कर्जवाटप करतात. दुसऱ्या वर्षी दिलेल्या कर्जाची परतफेड करण्याची रीत आजही कायम आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख