महाराष्ट्र तुमच्या एकट्याची जहागीर नाही, नाना पटोलेंना राम कदमांचे प्रत्युत्तर… - maharashtra is not only your estate ram kadams replay to nana patole | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्र तुमच्या एकट्याची जहागीर नाही, नाना पटोलेंना राम कदमांचे प्रत्युत्तर…

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

राज्य सरकारच्या नेत्यांवर गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप विरोधी पक्षाकडून केले जात आहे. याबाबत केवळ आरोप करणे आणि तशी वस्तुस्थिती असणे, या दोन भिन्न गोष्टी आहे.

नागपूर : देशातील सन्माननीय कलाकार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना कॉंग्रेसचे नेते दिवसाढवळ्या धमक्या देत आहेत. महाराष्ट्रात त्यांचे चित्रपट आणि शुटींग बंद पाडू, अशा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. हा महाराष्ट्र काही तुमच्या एकट्याची जागीर नाही, त्यामुळे धमक्या देणे बंद करा, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राम कदम यांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिले आहे. 

देशाच्या हिताच्या बाजूने बोलणे किंवा ट्विट करणे हा कलाकारांचा अपराध आहे का? कॉंग्रेस पक्षाला झाले तर काय असे प्रश्‍न करीत राम कदम म्हणाले, देशाच्या बाजूने जो कुणी उभा राहील, त्याच्या सोबत देश आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी धमक्या देऊ नये. अशा धमक्यांना उत्तर देणे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यांच्या अशा धमक्यांना कुणाही भीक घालणार नाही. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर आकाशाला भिडले आहेत. देशात जेव्हा मनमोहन सिंह यांचं सरकार होतं, त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने टिका करायचे. आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये महागाईने जनता हवालदिल झाली असताना त्यांची टिव टिव का बंद झाली, असा सवाल करीत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर आज सकाळी टिका केली होती. कदम यांनी दुपारी त्यांना उत्तर दिले. 

नाना पटोले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज प्रथमच भंडारा जिल्ह्यात त्यांचे आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करून जेसीबीने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे किंवा शुटींग आता आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना या अभिनेत्यांना जनतेवरचा अन्याय, अत्याचार दिसत होता. त्यावर टिका करताना ते फार टिव टिव करायचे. आता नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांवर, सामान्य जनतेवर दररोज अत्याचार करीत आहे. आता या अभिनेत्यांना तो दिसत नाहीये का? मोदी सरकारच्या अत्याचाराच्या विरोधातही या अभिनेत्यांनी आता आवाज उचलावा आणि जनतेच्या बाजूने उभे रहावे, अन्यथा महाराष्ट्रात त्यांचे सिनेमे आणि शुटींग होणार नाही, याची पूर्ण व्यवस्था आम्ही करू, असा सणसणीत इशारा नाना पटोलेनी दिला होता.   

शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या प्रश्‍नासाठी मी नेहमीच आक्रमक राहिलो आहे. मोदी सरकारने आज देश विकायला काढला आहे. देशातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर फास्टटॅगची सक्ती करून लोकांच्या खिशातील पैसा लुटण्याचे काम सुरू आहे. जनतेचे खिसे कापण्याचे काम करण्यासाठीच हे सरकार आणण्यात आलं आहे. सत्तेवर येण्यापूर्वी मोदींनी जी भूमिका देशवासीयांसमोर मांडली होती, त्या भूमिकेला फाटा देण्यात येत आहे. सरकारच्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात कॉंग्रेस आता अधिक आक्रमक झाली असल्याचे नाना पटोले म्हणाले होते. 

\

राज्य सरकारच्या नेत्यांवर गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप विरोधी पक्षाकडून केले जात आहे. याबाबत केवळ आरोप करणे आणि तशी वस्तुस्थिती असणे, या दोन भिन्न गोष्टी आहे. येथे एक सांगता येईल की, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा जनता आपआपल्या घरांमध्ये होती. त्यावेळी त्याची आत्महत्या नसून हत्या आहे, असे तीन महिन्यांपर्यंत टीव्हीवर लोकांना दाखवण्यात आले. त्यानंतर ते प्रकरण सीबीआयच्या चौकशीत नेण्यात आले. त्यानंतर त्या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल येणे अपेक्षित होते. पण तो अहवाल आला नाही. कारण त्यामध्ये भारतीय जनता पक्षातील मोठे नेते गुंतलेले होते. त्यामुळे त्याचा अहवाल दिला गेला नाही. यावरून त्या प्रकरणाची वस्तुस्थिती काय होती आणि आहे, हे लक्षात येते. महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या विरोधात जे आरोप केले जात आहेत, ते केवळ आरोप आहेत. त्यातील वस्तुस्थिती जेव्हा समोर येईल, त्यावेळी कॉंग्रेस आपली भूमिका मांडणारच आहे, असे नाना म्हणाले होते. 

नाना पटोलेंनी आज सकाळी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ नेत्यांना इशारा दिल्यानंतर आमदार राम कदम यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले  आहे. आता यावर कॉंग्रेस नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख