तुझा चेहरा अॅसिड टाकून विद्रूप करू : खासदार नवनीत राणांना धमकी - lets disfigure your face by throwing acid mp navnit navnit rana threatened | Politics Marathi News - Sarkarnama

तुझा चेहरा अॅसिड टाकून विद्रूप करू : खासदार नवनीत राणांना धमकी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

8 फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर मी जे भाषण केले, त्यानंतर शिवसेना पक्षाच्या लेटरहेडवर अज्ञात पत्राद्वारे धमकी देण्यात आल्याचे राणा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तसेच त्यांचे पती तथा आमदार रवी राणा यांना धमकीचे पत्र आल्याची तक्रार त्यांनी केली असून या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे. 8 फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर मी जे भाषण केले, त्यानंतर शिवसेना पक्षाच्या लेटरहेडवर अज्ञात पत्राद्वारे धमकी देण्यात आल्याचे राणा यांनी तक्रारीत म्हटले आहे.  

तक्रारीत खासदार नवनीत राणा म्हणतात, गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या कामांमधील चुका मी संसदेत सांगितल्या. गेल्या दहा महिन्यांपासून लोकांचे काय मत आहे, हेसुद्धा मी त्या ठिकाणी सांगितले. संविधानाने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. सरकारची कमी सांगणे हे माझे कर्तव्य होते, त्यामुळे ती माहिती मी दिली. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी मला एक पत्र मिळाले. ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते, तो चेहरा ॲसिड टाकून विद्रूप करून टाकू, अशी धमकी त्या पत्रात होती. तुमचे पती तथा आमदार रवी राणा यांनासुद्धा ज्या पद्धतीने आम्ही अन्य लोकांशी वागतो, तशाच पद्धतीने त्यालाही वागणूक दिली जाईल. तुम्हाला फिरण्याच्या लायकीचे सोडणार नाही, अशी धमकीसुद्धा त्या पत्रातून देण्यात आली. खासदार राणा यांनी सांगितले. या पत्राच्या बाबतीत संसदेच्या पोलिस ठाण्यात तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

मी संसदेत दिलेल्या भाषणाबद्दल ८ दिवसांत माफी मागितली नाही तर मला जिवे मारण्यात येईल. मराठीत लिहिलेल्या या धमकीपत्रात घाणेरड्या शिव्या लिहिलेल्या आहेत. ते पत्र तक्रारीसोबत जोडले आहे. याशिवाय माझे पती आमदार रवी राणा यांनी निनावी कॉल्स करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. शिवसेना नेते संजय राऊत आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी हे धमकीपत्र पाठविल्याची शंका तक्रारीत व्यक्त केली गेली आहे. महिला खासदाराच्या बाबतीत अत्यंत घाणेरडे शब्द वापरले गेले आहेत. खासदार काय पण कुण्याही महिलेच्या बाबतीत अशी भाषा वापरणे सर्वार्थाने अयोग्य असल्याचे खासदार राणा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

येत्या आठ दिवसांत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची माफी मागितली नाही, तर शिवसेना स्टाईलने आमदार रवी राणांनाही चोप देऊ, अशी गंभीर धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. माथेफिरू कृत्य करणाऱ्यांची पोलिसांनी तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार राणा यांनी तक्रारीतून केली आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख