राज्यपालांनी अध्यक्ष निवडीची काळजी करू नये, तर आमदारांच्या नियुक्तीकडे लक्ष घालावे... - governor should not worry about the election of the president should concentrate on mlas | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपालांनी अध्यक्ष निवडीची काळजी करू नये, तर आमदारांच्या नियुक्तीकडे लक्ष घालावे...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

सुशांतसिंग राजपूतप्रकरणी भाजपने असेच आकांडतांडव केले होते. सीबीआय चौकशी लावली होती. मात्र हाती काहीच लागले नाही.

नागपूर : सध्या राज्यपालांनी राजभवनाला भाजपचे कार्यालय बनवले आहे आणि विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीची काळजी त्यांनी लागली आहे. आपली कामे सोडून बाकी सर्वत्र त्यांचे लक्ष आहे. विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीची काळजी त्यांनी करू नये, तर विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीकडे लक्ष द्यावे, असा सल्ला कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांना दिला. 

पटोले म्हणाले, विधानसभेचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार विधानसभेतील आमदारांना आहे. त्याची चिंता राज्यपालांना करायची गरज नाही. काल भंडारा दौऱ्यावर जाताना नाना पटोले यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार या राज्यपालांच्या प्रश्नावर विचारणा केली असता ते म्हणाले, बारा आमदारांची नियुक्ती कधी करणार हे त्यांनी आधी सांगावे. राज्यपाल भगतसिंग कोशियारी भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत. त्यांनी राजभवनाला राजकीय पक्षाचे कार्यालय केले आहे. त्यांची भूमिका संपूर्ण राज्याला माहीत आहे. बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत ते बोलत नाही. विधानसभेचा अध्यक्ष अधिवेशनात मतदानाने निवडण्यात येतो. त्यामुळे तो केव्हा निवडणार हा प्रश्नच उद्‍भवत नाही. 

अधिवेशन होईल तेव्हा अध्यक्षही निवडला जाईल. याची चिंता राज्यपालांना करण्याचे कारण नाही. बारा सदस्यांची निवड केली जात नसल्याने काँग्रेसने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्याचे काय झाले, अशी विचारणा केली असताना पटोले यांनी कुठल्या नियमात न्यायालयात जाता येईल, हे तपासले जात आहे. कायदेतज्ज्ञांचे मत याकरिता घेण्यात येत आहे. पूजा राठोड प्रकरणी जोपर्यंत सत्यता समोर येत नाही, तोपर्यंत अधिक बोलणे योग्य नाही. भाजपलाच याची जास्त घाई झाल्याचे दिसून येत असल्याचा टोला त्यांनी हाणला. 

सुशांत सिंग प्रकरणी भाजपचा नेता? 
सुशांतसिंग राजपूतप्रकरणी भाजपने असेच आकांडतांडव केले होते. सीबीआय चौकशी लावली होती. मात्र हाती काहीच लागले नाही. सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी भाजपच्याच एक मोठ्या नेत्याचे नाव पुढे येत असल्याने आता ते गप्प बसले असल्याचेही पटोले म्हणाले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख