यवतमाळ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळातच आपल्या निवासस्थानी मुक्कामी असल्याची माहिती आज सूत्रांनी दिली. सध्या ते पोहोरादेवी येथे सहकुटुंब दर्शनासाठी जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. तसा त्यांचा अधिकृत दौराही जाहीर झाला आहे.
परळी येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते जनतेसमोर कधी येतात, याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भाने खुलासा व्हावा, म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी अजूनही त्यांच्या निवासस्थानासमोर डेरेदाखल आहेत. ते कधी समोर येतात याची प्रतीक्षा करीत आहेत. ते बाहेर येताच थेट पोहोरादेवी येथे जाण्यासाठी निघणार असल्याची माहिती आहे. दुपारी 2 वाजता धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराज देवस्थानात देवदर्शनासाठी जाणार आहेत. तेथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यवतमाळ येथे येऊन कोरोनाचा आढावा घेऊन उपाय योजना सुचविणार आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा असून ते माध्यमासोबत काय बोलतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
संजय राठोड यांचा जाहीर केलेला शासकीय दौरा पुढीप्रमाणे आहे. वनमंत्री राठोड सकाळी 9 वाजता श्रीक्षेत्र पोहोरादेवी येथे शासकीय वाहनाने आर्णी, दिग्रस मार्गे जाणार आहेत. सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र पोहोरागड येथे आगमन व भेट. दुपारी 1 वाजता दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव) येथील मुंगसाजी महाराज मंदिरात दर्शन. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यलयात कोरोनाचा आढावा घेतील. हा त्यांचा शासकीय दौरा असला तरी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक व कुटुंबीय राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर ते प्रथम सार्वजनिकरित्या जनतेसमोर येत आहेत. पोहोरदेवी येथे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमणार असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
Edited By : Atul Mehere

