ज्या डॉक्टरने पूजा राठोडचा गर्भपात केला तो ८ फेब्रुवारीपासून गायब? - Doctor who performed abortion on pooja rathore has been missing from 8 February | Politics Marathi News - Sarkarnama

ज्या डॉक्टरने पूजा राठोडचा गर्भपात केला तो ८ फेब्रुवारीपासून गायब?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

मंत्री आधीच पुणेच्या एका रिसॉर्टवर सहपरिवार गेलेल्या त्यांच्या एका मित्राला कॉल करतात आणि सांगतात की, तू तिला समजावून यवतमाळला घेऊन ये आणि ऐकत नसेल तर रातोरात उचलून आण.

नागपूर : यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयात पूजा अरुण राठोडचा गर्भपात केला असल्याची माहिती पुढे आली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या झालेल्या या प्रकरणात ओळख न पटवता पूजाला दाखल करून घेण्यात आले का आणि करुन घेतले तर कुणाच्या दबावाखाली, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. गंभीर बाब म्हणजे ज्या डॉक्टरने पूजाचा गर्भपात केला, ते तिचा मृत्यू झाल्याच्या दिवसापासून गायब असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या रुग्णालयात पूजा अरूण राठोड असे नाव संबंधित रुग्णाचे नोंदविण्यात आले आहे. सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाशी या नावाचा संबंध आहे की काय, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. या प्रकरणात पूजा चव्हाण, अरुण राठोड अशी नावे आहेत. त्याचा नावाच्या आधारे या रुग्णालयात नोंद झाली आहे. जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत या रुग्णाची नोंद झाली आहे. या योजनेंतर्गत प्रसुती व इतर उपाय केले जातात. या योजनेंतर्गत पूजा राठोडचा गर्भपात झाला की काय, यावर तेथील डाॅक्टर बोलायला तयार नाहीत.  

४ फेब्रुवारीला व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनुसार, ज्या मंत्र्यांचे नाव या प्रकरणात पुढे आले आहे. त्यांच्या एका सहकाऱ्यांने त्यांना सांगितले होते की, ‘ती मुलगी गर्भपात करण्यास तयार नाही आणि आत्महत्या करण्याचे विचार तिच्या मनात येत आहेत.’ त्यावर मंत्री म्हणतात, ‘तिला समजावून सांग की जीवनात असे प्रसंग येत असतात. पण आत्महत्या त्यावरचा उपाय नाही.’ पण त्यानंतरही ती मुलगी ऐकत नाही, असे तो सहकारी सांगतो. हे बघून कथित मंत्री आधीच पुण्याच्या एका रिसॉर्टवर सहपरिवार गेलेल्या त्यांच्या एका मित्राला कॉल करतात आणि सांगतात की, तू तिला समजावून यवतमाळला घेऊन ये आणि ऐकत नसेल तर रातोरात उचलून आण, पण कसंही करून घेऊन ये. त्यानुसार तो मित्र तिला घेऊन यवतमाळला येतो. त्यानंतर ५ फेब्रुवारीला पूजा अरुण राठोडला यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल करण्यात येते. 

५ फेब्रुवारीला जेव्हा दिला दाखल करून घेण्यात आले तेव्हा डॉ. श्रीकांत वऱ्हाडे कर्तव्यावर होते. त्याचवेळी दुसऱ्या एका डॉक्टरने डॉ. वऱ्हाडेंना सांगितले की, ही माझी केस आहे. तुम्ही यामध्ये लक्ष देऊ नका. त्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. पण हे सर्व करताना तिचे आधार कार्ड घेण्यात आले की नाही, हासुद्धा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तिचे आधार कार्ड कोणते देण्यात आले आणि केसपेपर तयार केले की नाही, याबाबतही उलटसूलट चर्चा आहेत. त्यानंतर ६ फेब्रुवारीला ‘मला भूक लागली (मुलीचा आवाज) आणि मंचुरीयन खाऊन घे (पुरूषाचा आवाज), असे संभाषण असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर ७ फेब्रुवारीला तिला पुणे येथे नेण्यात आले. त्यानंतर ८ फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. अशा पद्धतीने सर्व घटनाक्रम झाला असल्याची माहिती ‘सरकारनामा’ला मिळाली. 

Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख