संजय राठोड केव्हा येतील, ते माहिती नाही, पण दोन दिवस आधी कळवू... - do now know when sanjay rathore will come but will inform you two days before | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोड केव्हा येतील, ते माहिती नाही, पण दोन दिवस आधी कळवू...

गजानन भोयर
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही दबावाला बळी पडू नये आणि प्रकरणाची योग्य चौकशी करावी. तोपर्यंत विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विचारसुद्धा करू नये.

वाशीम : पुण्यातील पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून सातत्याने विविध आरोप करण्यात येत आहेत. तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत. आज ते पोहरादेवी येथे येणार, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांना दिली होती. पण मंत्री राठोड आज आले नाहीत. दरम्यान समाजातील संत, महंत आणि तांडाप्रमुखांची बैठक आज पोहरादेवी येथे झाली. त्यानंतर राठोड केव्हा येतील, हे माहिती नाही. पण ते येतील त्याच्या दोन दिवस आधी माध्यमांना कळवू, असे सुनील महाराज यांनी आज माध्यमांना सांगितले. 

पोहरादेवी येथे झालेल्या बैठकीला महंत बाबूसिंग महाराज, संजय महाराज, जितेंद्र महाराज, कबिरसिंग महाराज, शेखर महाराज आणि तांड्यांतील प्रमुख मंडळी उपस्थित होती. परमपूज्य संत सेवालाल महाराज, महंत डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीस्थळावर राठोड यांनी दर्शन घ्यावे आणि ज्या धडाडीने ते यापूर्वी काम करीत होते, त्याच धडाडीने पुढे त्यांनी काम सुरू ठेवावे, समाज त्यांच्या पाठीशी आहे, असेही सुनील महाराज यांनी यावेळी सांगितले. आजच्या बैठकीत संजय राठोड यांच्याबाबत पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र बैठकीत संजय राठोड यांच्यासंदर्भात कोणताच निर्णय झाला नाही. 

पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी कुठलाही आरोप केला नाही. त्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दबावात येऊ नये आणि कुठलाही निर्णय घेऊ नये. तसेच संजय राठोड यांनी याठिकाणी आपल्या कुटुंबासह येऊन येथील विकास कामांचा आढावा घ्यावा. धर्मपिठाधीश्‍वर बाबूसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थान ट्रस्टी अध्यक्ष कबिरदास महाराज, सुनील महाराज यांच्यासह बंजारा समाजाच्या सर्व संत महंतांनी चर्चा केली. यानंतर जितेंद्र महाराज आणि कबिरदास महाराज यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्या संदर्भात भाविकांना काही महत्वाच्या सूचना द्यायच्या होत्या, त्याबाबत आम्ही चर्चा केली. 

संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढवला जात आहे. पण मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही दबावाला बळी पडू नये आणि प्रकरणाची योग्य चौकशी करावी. तोपर्यंत विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विचारसुद्धा करू नये. पोलिस चौकशी पूर्ण झाल्यानंतरच निर्णय घ्यावा, असे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे यांनी आम्ही करणार असल्याचेही महंतांनी यावेळी सांगितले. गत तीन तारखेला नगारा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर कामही सुरू झाले. पण सद्यस्थितीत काम बंद आहे. त्यामुळे संजय राठोड यांनी कुटुंबासह येथे येऊन विकास कामांचा आढावा घ्यावा आणि पुढील काम सुरू करावे, असेही सुनील महाराज म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख