शिवकुमारच्या त्रासामुळेच झाला होता दीपालीचा गर्भपात, गुन्ह्यांच्या कलमांमध्ये वाढ.. - deepalis abortion was due to shivkumars trouble increased in crime causes | Politics Marathi News - Sarkarnama

शिवकुमारच्या त्रासामुळेच झाला होता दीपालीचा गर्भपात, गुन्ह्यांच्या कलमांमध्ये वाढ..

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

शिवकुमारने दीपाली यांना शिवीगाळ करून निलंबित करण्याची धमकी दिली. त्यांना भयभीत करून अपमानीत केल्याचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या तपासातून पुढे आले. त्यावरूनसुद्धा कलमांमध्ये वाढ करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवकुमार सद्य:स्थितीत न्यायालयीन कोठडीअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात आहे.

अमरावती : मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या त्रासामुळेच आत्महत्या केली. त्यानंतर शिवकुमारला अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत शिवकुमारने दिलेल्या त्रासामुळेच दीपाली यांचा गर्भपात झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आता शिवकुमारवर दाखल गुन्ह्याच्या कलमांमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. 

आयएफएस अधिकारी शिवकुमारविरुद्ध धारणी ठाण्यात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता काही कलमांची वाढ करण्यात आली. गर्भपात होण्यास कारणीभूत ठरणे, मारण्याची व जीवे मारण्याची धमकी देणे याप्रकरणी कलम ३१२, ५०४ आणि ५०६ अन्वये त्यात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. २५ मार्च २०२१ रोजी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी दीपाली चव्हाण यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती.

त्याच दिवशी दीपाली यांच्या आत्महत्येसाठी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक शिवकुमार हेच जबाबदार आहेत, असा आरोप दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत केला होता. त्यामुळे शिवकुमारविरुद्ध गुन्हा दाखल होऊन २६ मार्च रोजी त्याला नागपूर येथून अटक केली होती. 

शिवकुमारने त्रास दिल्यामुळेच आपला गर्भपात झाला, असे आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दीपाली चव्हाण यांनी नमूद केले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला. या मुद्यावर पडताळणी करताना दीपाली चव्हाण यांनी घेतलेल्या औषधोपचाराचे दस्तऐवज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. त्याचा बारकाईने तपास केला. अनेक साक्षीदारांचे बयाण नोंदविले. नोंदविलेले बयाण, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय दस्तऐवज हे पोलिसांच्या हाती लागले. त्यावरून कलमांमध्ये वाढ करण्यात आली.

हेही वाचा : देशाने पहिल्यांदाच पोलिस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री 'हप्ता वसूली' करताना पाहिले!

शिवकुमारने दीपाली यांना शिवीगाळ करून निलंबित करण्याची धमकी दिली. त्यांना भयभीत करून अपमानीत केल्याचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या तपासातून पुढे आले. त्यावरूनसुद्धा कलमांमध्ये वाढ करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवकुमार सद्य:स्थितीत न्यायालयीन कोठडीअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख