अभिताभ बच्चन व अक्षय कुमार प्रकरणात कोणतेही घुमजाव केले नाही : नाना पटोले

गिरिष महाजन यांनी महाराष्ट्रात मोगलाई सुरू असल्याचे वक्तव्य केले. या विधानावरून नाना पटोले यांनी महाजनांचा चांगलाच समाचार घेतला. गिरिष महाजन सध्या लहान असल्याची खोचक टिका त्यांनी केली.
Nana Patole - Akshay Kumar - Amitabh Bacchan
Nana Patole - Akshay Kumar - Amitabh Bacchan

भंडारा : अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमारचे सिनेमे आणि व शुटींगवर बंदी घालण्याबाबत मी बोललो, तर भाजपला या दोन अभिनेत्यांचा कसा पुळका आला, ते देशातील जनतेने पाहिले आहे. देशातल्या महागाईने सामान्य जनता कशी मोडली आहे, हे या अभिनेत्यांना आता दिसत नाहीये का? तेव्हा जे बोललो होतो, ते आजही सांगतो. जेथे जेथे या दोन अभिनेत्यांचे सिनेमे प्रदर्शित होतील, तेथे आम्ही काळे झेंडे घेऊन विरोध करू आणि तो लोकशाही मार्गाने करू. या दोन अभिनेत्यांबाबत बोललेल्या विधानावरून मी कुठलेही घुमजाव केलेले नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे ठणकावून सांगितले.  

ते आज भंडारा न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीकरीता आले होते. पटोले म्हणाले, डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरात भरमसाठ वाढ झाली, लोकांचे जगणे मुश्‍कील झाले आणि केंद्रीय मंत्री धर्मेन्द्र प्रधान सांगतात की, आता आमच्या हातात काही राहिलेले नाही. त्यांनी बोलल्यापेक्षा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच जनतेला सांगितले पाहिजे की, पेट्रोल कंपन्या आतापर्यंत सार्वजनिक मालकीच्या होत्या, त्या आम्ही आमच्या ‘त्या’ दोन बगलबच्च्यांना विकल्या आहेत आणि देशाच्या जनतेला काहीही मदत करू शकत नाही. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटात जनता होरपळली गेली. आज गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीत पोळून निघत आहे. सामान्यांच्या ताटातलं अन्न या सरकारने हिसकावले आहे. याची कारणे मोदी सरकारने जनतेला आता सांगितली पाहिजे. कारण सामान्यातल्या सामान्य माणसाला या सरकारचे इरादे समजले आहेत. नानांच्या व्यक्तव्यावर राज्यातून विरोध सुरू झाल्यानंतर नाना पटोले यांनी घुमजाव केल्याचे सांगितले जात होते. त्यावर त्यांनी आज स्पष्ट उत्तर दिले आहे. 

चौकशी अहवाल आल्यावर कॉंग्रेस मत मांडेल…
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात याच भाजपने तीन महिने सतत आरोप केले. मोदी सरकारने देशात आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला, मुंबईला बदनाम केले. नंतर ते प्रकरण सीबीआय चौकशीला पाठवले. पण त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. भाजपची ही कार्यपद्धती आहे की, बिनबुडाचे आरोप लावायचे, लोकांची दिशाभूल करायची आणि मूळ मुद्द्य़ाला बगल द्यायची. दिवसागणिक वाढत चाललेल्या महागाईवरून लोकांचे ध्यान भरकटवण्यासाठी ते पूजा चव्हाण प्रकरण तापवत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीचा अहवाल जेव्हा येईल, त्यानंतर कॉंग्रेस आपले मत मांडेल, असे पटोले म्हणाले. 

गिरीष महाजन अजून लहान
गिरिष महाजन यांनी महाराष्ट्रात मोगलाई सुरू असल्याचे वक्तव्य केले. या विधानावरून नाना पटोले यांनी महाजनांचा चांगलाच समाचार घेतला. गिरिष महाजन सध्या लहान असल्याची खोचक टिका टिका त्यांनी केली. भारत मातेच्या नावावर भाजप मोठा झाला आहे. त्या भारत मातेलाच विकण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने तीन काळे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आणले. त्यामुळे मोगलाई कुणाची आहे, हे एव्हाना जनतेच्या लक्षात आले आहे. काळ्या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या रस्त्यांत सरकार खिळे ठोकले जात आहेत, तारांचे कुंपण केले जातेय. यावरून मोगलाई कुणाची सुरू आहे, हे वेगळे सांगण्याची गरज आता उरली नाही. त्यामुळे गिरीष महाजनांचे वक्तव्य जनता मनावर घेणार नाही, असे नाना पटोले म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com