संजय राठोड माध्यमांसमोर आलेच नाहीत.. आज महंत, तांडा नायकांची बैठक.. - after all sanjay rathord did not appear in front of the media | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोड माध्यमांसमोर आलेच नाहीत.. आज महंत, तांडा नायकांची बैठक..

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

पोहरादेवी येथे आज बंजारा समाजाच्या महंतांची बैठक होणार आहे. 

नागपूर : बीड जिल्ह्याच्या परळीतील तरुणी पूजा चव्हाणचा ८ फेब्रुवारीला मृत्यू झाल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा तिच्या मृत्यूशी थेट संबंध जोडला जात आहे. तेव्हापासून राठोड गायब आहेत. आज वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाचे दैवत असलेल्या पोहरादेवी येथे ते येणार असल्याच्या बातम्या गेले दोन दिवस माध्यमांमध्ये येत होत्या. पण आज राठोड तेथे पोहोचलेच नाहीत. 

मंत्री संजय राठोड पोहरादेवीत येणार म्हणून अनेकांचे लक्ष पोहरादेवीकडे लागले होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनी पोहरादेवीकडे कूच केली होती. नागपूरच नव्हे तर मुंबईतीलही माध्यम प्रतिनिधी पोहरादेवीतील माहिती देशासमोर आणण्यास सरसावले होते. पण संजय राठोड येणार नाहीत, अशी माहिती काल समाजाचे महंत सुनील महाराज यांनी दिल्यानंतर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी माघारी फिरले.

संजय राठोड जोपर्यंत जगासमोर येत नाहीत, तोपर्यंत प्रकरण नेमके काय आहे, हे कळू शकणार नाही. विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर केल्या जात असलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही, याचासुद्धा उलगडा होणार नाही. अरुण राठोड हे नाव या प्रकरणात पुढे आले आहे. तो कोण आहे, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज त्याचा आहे की नाही, या प्रकरणाशी त्याचा काय संबंध, पूजा अरुण राठोड नामक युवतीचा गर्भपात यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती काल मिळाली. 

ही पूजा राठोड कोण, पूजा चव्हाणच्या मृत्यूशी तिचा काय संबंध आणि पूजा राठोडचा गर्भपात करणारा डॉक्टर पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यानंतर फरार का झाला, अशा एक ना अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा सध्या प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे संजय राठोड, अरुण राठोड आणि फरार झालेला तो डॉक्टर यांच्यापैकी कुणीतरी एक जोपर्यंत पुढे येत नाही, तोपर्यंत या प्रश्‍नांची उत्तरे मिळू शकणार नाहीत, असे सध्या सर्वत्र बोलले जात आहे.

काय होणार बैठकीनंतर ?

पोहरादेवी येथे आज बंजारा समाजाच्या महंतांची बैठक होणार आहे. या बैठकीत ते संजय राठोड यांच्याबाबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर माध्यमांसमोर येऊन माहिती देणार असल्याचे महंत सुनील महाराज यांनी सांगितले. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर संजय राठोड लोकांसमोर येणार की नाही आणि येणार तर केव्हा, या प्रश्‍नांची उत्तरे मिळणार आहेत. 

संजय राठोड गायब नाहीत : अजित पवार
संजय राठोड गायब नाहीत, ते आमच्या संपर्कात आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या कोरोना स्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा झाली, असा पुनरुच्चार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने आणि जोरात सुरू असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या प्रकरणातील तथ्‍य लवकरच जनतेसमोर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख