nagpur-jayant-patil-vaibhav-patil | Sarkarnama

वैभव राऊत कुणावर बॉम्ब टाकणार होता ? : जयंत पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सनातन संस्थेशी संबंधित असणाऱ्या वैभव राऊतला अनेक बॉम्बसह पोलिसांनी अटक केली. विचारवंतांच्या हत्येनंतर वैभव राऊत कुणावर बॉम्ब टाकणार होता, याचा खुलासा तपास यंत्रणेने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

गडचिरोली  : सनातन संस्थेशी संबंधित असणाऱ्या वैभव राऊतला अनेक बॉम्बसह पोलिसांनी अटक केली. विचारवंतांच्या हत्येनंतर वैभव राऊत कुणावर बॉम्ब टाकणार होता, याचा खुलासा तपास यंत्रणेने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीसाठी जयंत पाटील शनिवारी (ता. 18) गडचिरोलीत आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

श्री. पाटील म्हणाले, की दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येतील आरोपी अजून सापडले नाहीत. काही दिवसांपूर्वी वैभव राऊतसला बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली आहे. वैभव राऊत सनातन संस्थेशी संबंधित आहे. वैभव राऊत कुणावर बॉम्ब टाकण्यासाठी साहित्य जमा केले होते, याचा खुलासा तपास यंत्रणेने करण्याची आवश्‍यकता आहे. 

वैभव राऊतला अनेक बॉम्बसह पकडण्यात आले. आता त्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढून तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा दबाव भाजप समर्थकांकडून टाकण्यात येत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
 
पराभव दिसत असल्याने एकत्रित निवडणुका 
येत्या काही महिन्यांत चार राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट पराभव दिसत असल्यानेच भाजप लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा डाव आखत आहे, अशी टीका पाटील यांनी केली. 

2014 च्या निवडणुकीत मोदी विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आता मोदी नेमका कोणता कार्यक्रम घेऊन जनतेपुढे जाणार आहेत, असा सवाल पाटील यांनी केला.
 
आरक्षणाला विरोध केला जात आहे. ओबीसी समाज या गोष्टी विसरणार नाही. राज्यघटना जाळणारे लोक आरक्षणविरोधी घोषणा देत होते. आधी रस्त्यावर ट्रायल घ्यायची आणि नंतर तो कार्यक्रम कृतीत उतरवायचा, असे भाजपचे धोरण असल्याचा आरोप पाटील यांनी केला. 

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, ज्येष्ठ नेते सुरेश सावकार पोरेड्डीवार, राष्ट्रवादीच्या ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुद्धे, राकॉंचे प्रभारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, चंद्रपूरचे नेते राजेंद्र वैद्य, मो. युनूस शेख, जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ बोरकुटे उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख