nagpur-gajanan-kirtikar-shivsena-incharge-east-vidharbha | Sarkarnama

गजानन किर्तीकर पूर्व विदर्भासाठी सेनेचे संपर्क प्रमुख 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांची शिवसेनेचे पूर्व विदर्भासाठी संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. गेल्या चार वर्षात सेनेचे पूर्व विदर्भाचे ते चौथे संपर्क प्रमुख आहेत. 

नागपूर : शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांची शिवसेनेचे पूर्व विदर्भासाठी संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. गेल्या चार वर्षात सेनेचे पूर्व विदर्भाचे ते चौथे संपर्क प्रमुख आहेत. 

संघटनेच्या दृष्टीकोनातून शिवसेनेने पूर्व व पश्‍चिम विदर्भ असे दोन विभाग केले आहेत. पूर्व विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख विनायक राऊत होते. ते रायगडमधून खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी संपर्क प्रमुखपद सोडले. त्यांच्या जागी आमदार अनिल परब यांची नियुक्ती केली होती. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रणनीती ठरविण्यात त्यांचा सहभाग असल्याने त्यांच्याकडूनही ही जबाबदारी काढून घेण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच पूर्व विदर्भाची जबाबदारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर सोपविण्यात आली होती. 

मंत्रीपदामुळे ते सुद्धा फारसे लक्ष घालू शकत नव्हते. यामुळे आताही जबाबदारी खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जवळपास 20 वर्षांपूर्वी पूर्व विदर्भाची जबाबदारी गजानन किर्तीकर यांच्यावर होती. 1995 च्या युती सरकारच्या काळात गजानन किर्तीकर पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख होते. त्यावेळी ते राज्यमंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. आता पुन्हा त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. सध्या पूर्व विदर्भात शिवसेनेचा एक खासदार व एक आमदार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी किर्तीकर यांची नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख