nagpur-congress-rafeal-agitation | Sarkarnama

नागपुरातील कॉंग्रेस नेत्यांनी राफेल विरोधातील आंदोलन दुपारीच गुंडाळले 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

नागपूर शहर कॉंग्रेस समितीने आज राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या विरोधात धरणे आंदोलन करताना नागपुरातील कॉंग्रेस नेत्यांना उन्हं न सोसावल्यामुळे दुपारी 2 वाजताच आंदोलन गुंडाळले.

नागपूर : नागपूर शहर कॉंग्रेस समितीने आज राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या विरोधात धरणे आंदोलन करताना नागपुरातील कॉंग्रेस नेत्यांना उन्हं न सोसावल्यामुळे दुपारी 2 वाजताच आंदोलन गुंडाळले.
 
अ. भा. कॉंग्रेस समितीने देशभरात राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या विरोधात आंदोलन करण्याचे निर्देश दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजक अनिल अंबानी यांना फायदा करून देण्यासाठी यूपीए सरकारने केलेल्या करारात बदल केल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात येत आहे. यामुळे देशाला प्रति विमान जवळपास 1000 कोटी रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे. 

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या मुद्याला जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अ. भा. कॉंग्रेस समितीच्या निर्देशानुसार नागपूर शहर कॉंग्रेस समितीने सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागपुरातील संविधान चौकात धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. सकाळी 11 वाजेपासून कार्यकर्ते संविधान चौकात जमा होऊ लागले होते परंतु शामियाना तसेच फलक लावण्यात आले नव्हते. साडेअकरा वाजल्यानंतरही फलक लावण्याचे काम सुरू होते. नागपुरात उन्हाचे चांगलेच चटके जाणवत होते. शहर कॉंग्रेस समितीने कार्यकर्त्यांसाठी शामियानामध्ये पंख्याची व्यवस्था केली होती. 

कॉंग्रेस नेत्यांची भाषण आटोपली. बहुतेक न्यूज चॅनेल्सना दुपारी 1 वाजता बाईट देणे झाल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांचा उत्साहाला ओहोटी लागली. दुपारी 2 नंतर शामियाना रिकामा झाला. हे आंदोलन दिवसभर राहणार असल्याने काही कार्यकर्ते दुपारी 2 नंतर संविधान चौकात पोहोचले. तेव्हा संविधान चौकात कॉंग्रेसचे नेते नव्हते. या आंदोलनासाठी उभारलेला शामियाना काढण्याचे काम कामगार करीत होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख