Nagpur Congress politics | Sarkarnama

सुनील केदारांना धमकी कुणाची? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 मार्च 2017

कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी धमकी मिळत असल्याचा आरोप जाहीर सभेत केल्याने हा धमकी देणारा कोण, असा सवाल आता पुढे आला आहे. 

नागपूर : कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी धमकी मिळत असल्याचा आरोप जाहीर सभेत केल्याने हा धमकी देणारा कोण, असा सवाल आता पुढे आला आहे. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा 30 मार्चला नागपुरात पोहोचली. या वेळी झालेल्या सभेत आमदार सुनील केदार यांनी आपल्याला धमकी मिळत असल्याचा गौप्यस्फोट केला. आमदार सुनील केदार "दबंग नेता' म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर अनेक फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. 

महापालिका निवडणुकीच्या काळात आमदार सुनील केदार यांनी कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. अपक्ष उमेदवाराच्या प्रचार यात्रेत सहभागी झाल्याचे छायाचित्रेही वर्तमानपत्रेही प्रसिद्ध झाले आहेत. या प्रकाराची तक्रार कॉंग्रेसचे उमेदवार दीपक वानखेडे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. 

संघर्ष यात्रेच्या दरम्यान आमदार केदार यांच्यावर हल्ला करण्यात येईल, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी कॉंग्रेसचे दीपक वानखेडे यांना ताब्यात घेतले होते. संघर्ष यात्रा नागपुरातून जाईपर्यंत वानखेडे यांना पोलिसांनी सोडले नव्हते. 

आमदार केदार यांनी जाहीरसभेत आपल्याला धमक्‍या मिळत असल्याचे सांगितले. या धमक्‍यांना आपण भीक घालत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धमक्‍या कोण देत आहे, याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. केदार यांचा रोख पक्षातील असंतुष्टाकडे असल्याची चर्चा होती. 

नागपुरातील सभा आमदार सुनील केदार यांनी आयोजित केल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार इतर कॉंग्रेसचे इतर नेतेही संघर्ष यात्रेत फिरकले नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख