Nagpur Congress may suffer turmoil again | Sarkarnama

नागपूर काँग्रेसमध्ये पुन्हा "दंगल'ची चिन्हे?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 एप्रिल 2017

नागपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी विकास ठाकरे यांची नियुक्ती झाल्यापासून नागपुरातील काँग्रेस नेत्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार एकीकडे व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत दुसरीकडे अशी फूट शहर काँग्रेसमध्ये पडली आहे.

नागपूर- नागपूर शहर काँग्रेस समितीमधील मतभेद मिटण्याची कोणतीही शक्‍यता नसून शहर काँग्रेसची फेररचना करून चतुर्वेदी व राऊत गटाला बाजूला ठेवण्याच्या प्रस्तावाला पक्षश्रेष्ठीकडून हिरवा सिग्नल मिळाल्याचे समजते.

नागपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी विकास ठाकरे यांची नियुक्ती झाल्यापासून नागपुरातील काँग्रेस नेत्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार एकीकडे व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत दुसरीकडे अशी फूट शहर काँग्रेसमध्ये पडली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये चतुर्वेदी-राऊत गटाने उघडपणे काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रचार केला. या संदर्भातील अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आला आहे.

तसेच काँग्रेस पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमानाही चतुर्वेदी व राऊत हजर राहत नाहीत. त्यांच्या गटांच्या कार्यकर्त्यांनी शहर कॉंग्रेसच्या कार्यकारिणीतून राजीनामा दिला आहे. त्यामुळे या गटाच्या नेते व कार्यकर्त्यांचा नागपूर शहर काँग्रेस समितीच्या संघटनात्मक बाबींशी काहीही संबंध उरलेला नाही.

या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नव्याने संघटनात्मक बांधणीसाठी नवी शहर कार्यकारिणी जाहीर करण्याचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी ठरविले आहे. या नव्या शहर कार्यकारिणीतून चतुर्वेदी व राऊत गटाच्या कार्यकर्त्यांना संपूर्णपणे बाजूला सारून नवी कार्यकारिणी जाहीर होणार आहे. यात पराभूत झालेल्या उमेदवारांना स्थान मिळणार आहे. तसेच निवडणुकीत पक्षासाठी उमेदवारी मागे घेणारे व निवडणूक प्रचारात सहभाग घेणाऱ्यांना यावेळी संधी देण्यात येईल, असे विकास ठाकरे यांनी सांगितले.

या नव्या कार्यकारिणीवरून शहर काँग्रेसमध्ये पुन्हा आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्‍यता आहे. चतुर्वेदी व राऊत गटाला पूर्णपणे बाजूला ठेवण्याच्या प्रयत्न यातून केला जाणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख