`चाटुगिरी नेत्यांचे धंदे बंद होणार नाहीत, तोपर्यंत कॉंग्रेसला उभारी मिळणार नाही'

पुढील विधानसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प करण्यासाठी आयोजित नागपूर कॉंग्रेस मेळाव्यात आज कार्यकर्ते-पदाधिकारी, पक्षांतर्गत स्पर्धक नेत्यांचेच वाद उघडपणे पुढे आले.
`चाटुगिरी नेत्यांचे धंदे बंद होणार नाहीत, तोपर्यंत कॉंग्रेसला उभारी मिळणार नाही'

नागपूर : पुढील विधानसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प करण्यासाठी आयोजित कॉंग्रेस मेळाव्यात आज कार्यकर्ते-पदाधिकारी, पक्षांतर्गत स्पर्धक नेत्यांचेच वाद उघडपणे पुढे आले. 

उमाकांत अग्निहोत्री यांच्या भाषणादरम्यान एका कार्यकर्त्याने उमेदवारी देताना कार्यकर्त्यांना विचारणा होते काय? असा सवाल केला. माजी शहर कॉंग्रेस अध्यक्ष शेख हुसेन यांनी महिला पदाधिकाऱ्यावर बूथचे पैसे गडप केल्याचा आरोप केल्याने संतप्त महिलेने व्यासपीठावर येऊन धिंगाणा घातला. 

पुढील विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिने शिल्लक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर कॉंग्रेसतर्फे सिव्हिल लाईन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. 

माजी मंत्री विलास मुत्तेमवार अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार नाना पटोले प्रमुख वक्ते होते. व्यासपीठावर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे, किशोर गजभिये, ऍड. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, माजी शहराध्यक्ष शेख हुसेन, उमाकांत अग्निहोत्री, प्रा. बबनराव तायवाडे, विशाल मुत्तेमवार, युवक कॉंग्रेसचे बंटी शेळके, नगरसेवक मनोज सांगोळे, रमेश पुणेकर, पुरुषोत्तम हजारे, संजय महाकाळकर, हरीश ग्वालवंशी, नितीन साठवणे, नगरसेविका हर्षला साबळे, जयंत लुटे, रमण पैगवार आदी उपस्थित होते. 

उमाकांत अग्निहोत्री यांनी पक्ष देईल, त्या उमेदवाराचे काम करण्याचे आवाहन करताच, पुढे बसलेल्या एका कार्यकर्त्याने तुम्ही तुमची उमेदवार सोडाल काय? उमेदवारी न मिळाल्यास काम कराल काय? असे प्रश्‍न केले. त्याला इतरही कार्यकर्त्यांनी साथ दिली. 

रमण पैगवार यांनी `विजयासाठी परिश्रम घेतले, परंतु बूथवर कुणीच आढळून आले नाही,' अशी खंत व्यक्त केली. 

ऍड. अभिजित वंजारी यांनी कॉंग्रेसच्या दुरावस्थेसाठी स्वार्थी नेते जबाबदार असल्याचे नमुद करीत चाटुगिरी नेत्यांचे धंदे बंद होणार नाही, तोपर्यंत कॉंग्रेसला उभारी मिळणार नाही, असे नमुद करीत स्वपक्षातील नेत्यांवरच आसूड उगारला. त्यांचा रोख पूर्व नागपुरातील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर होता. 

विशाल मुत्तेमवार यांनीही बूथचा मुद्दा उपस्थित केला. अतुल कोटेचा यांनीही पक्षातील वाईट रितीवर प्रहार केला. किशोर गजभिये यांनी कॉंग्रेसला 52 जागा मिळाल्या हा योगायोग नाही तर विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवण्यासाठी भाजपने रचलेले षडयंत्र आहे, असा आरोप केला. पक्षातील लोकांना निवडून-निवडून पाडण्यात आले. अनेक ठिकाणच्या मशीन बदलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. 

यावेळी प्रास्ताविकातून शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी कॉंग्रेस पक्ष संपणारा नसून पक्षात खचणारे कार्यकर्ते नाहीत, असे नमुद करीत कार्यकर्त्यांत जोश भरला. त्यांनी पक्षासाठी काम न करणाऱ्या नेत्यांवर टिका केली. 

शेख हुसेन यांनी बूथसाठी पैसे घेऊन गेलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने बूथ लावलेच नसल्याचा आरोप केला. यावर पुढे बसलेल्या महिलेने संतापात व्यासपीठावर येऊन आपले स्पष्टीकरण दिले. यावर हुसेन यांनी मी कुणाचेही नाव घेतले नाही, अनेक बूथधारकांनी हाच प्रकार केल्याचे नमुद केले. वाद वाढल्याने शहरअध्यक्ष विकास ठाकरे यांना माईक वर येऊन कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याची पावती द्यावी लागली. तेव्हा कुठे हा वाद थांबला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com