Nagpur Congress crisis | Sarkarnama

नागपूर कॉंग्रेसचा वाद दिल्लीत 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 एप्रिल 2017

नागपूर शहर कॉंग्रेसमधील वाद थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. कॉंग्रेसमधील असंतुष्टांनी आता कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी थेट दिल्ली गाठली आहे. 

नागपूर : नागपूर शहर कॉंग्रेसमधील वाद थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. कॉंग्रेसमधील असंतुष्टांनी आता कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी थेट दिल्ली गाठली आहे. 

महापालिका निवडणुकीपासून सुरू झालेली वादावादी नागपुरात कॉंग्रेसचे पानिपत झाल्यानंतर थांबली नाही. एकेकाळी महापौरपदासाठी भांडणारी कॉंग्रेसची मंडळी आता महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करीत आहेत. प्रफुल्ल गुडधे पाटील यांना विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा होती. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांनी गुडधे पाटील यांच्या नावाला संमती दिली होती. परंतु माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुडधे पाटील यांच्या नावाला विरोध करून संजय महाकाळकर हे नाव समोर केले. महाकाळकर यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले. 

आता त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी पुन्हा असंतुष्टांनी कंबर कसली आहे. माजी सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत पडद्यामागून खेळी खेळत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गेव्ह आवारी व माजी मंत्री अशोक धवड यांना पुढे करून काही नगरसेवकांना दिल्लीला पाठविले आहे. या प्रफुल्ल गुडधे पाटील यांचाही समावेश आहे. ते उद्या (ता. 11) राहुल गांधी यांना भेटणार आहेत. यात विरोधी पक्षनेत्याला कॉंग्रेसच्या बहुसंख्य नगरसेवकांचा पाठिंबा नसल्याचा दावा केला जाणार आहे. आता राहुल गांधी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख