Nagpur congress crisis | Sarkarnama

पक्षविरोधी कारवायांमुळे चतुर्वेदी व राऊत यांच्यावर कारवाई? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 मार्च 2017

महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोप ठेवत पक्षश्रेष्ठींकडून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर : महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोप ठेवत पक्षश्रेष्ठींकडून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

चतुर्वेदी व राऊत या माजी मंत्रीद्वयांनी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारांविरोधात प्रचार केला. अपक्ष उमेदवारांचे समर्थन करणारे प्रसिद्धी पत्रके चतुर्वेदी-राऊत यांच्यातर्फे वितरित करण्यात आले. अनेक अपक्ष उमेदवारांच्या रॅलीमध्ये या दोन्ही नेत्यांनी सहभाग घेतला. या संदर्भातील पुरावे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीकडे (एमपीसीसी) आधीच पाठविण्यात आले आहेत. 
याच तक्रारी व पुराव्यांच्या धागा पकडून नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची गुरुवारी रात्री भेट घेतली. महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपदी संजय महाकाळकर यांची निवड झाल्याबद्दल ही सदिच्छा भेट होती. या वेळी चतुर्वेदी व राऊत यांच्या पक्षविरोधी कारवायांच्या संदर्भात प्रदेश कॉंग्रेसला पाठविलेल्या तक्रारीची प्रत सोपविण्यात आली. या वेळी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते. त्यापूर्वी कॉंग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांची ठाकरे यांनी भेट घेतली. या वेळी पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. 

पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांची गय करू नये, असे निर्देश राहुल गांधी यांनी प्रदेशाध्यक्षांना दिल्याचे समजते. यावरून चतुर्वेदी व राऊत या नेत्यांना काही दिवसांतच पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे समजते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख