टोल नाका हटवण्यासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन 

नागपूर-बैतुल महामार्गावरील पाटणसावंगी येथील टोल नाका स्थानांतरित करावा, या मागणीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्या नेतृत्वात काल दुपारी पाटणसावंगी टोल नाक्‍यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नागपूर-जबलपूर महामार्गावरील रामटेक तालुक्‍यातील मनसर टोल नाका स्थानांतरित करण्याचा आदेश देतेवेळी पाटणसांवगी टोल नाका स्थानांतरित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
टोल नाका हटवण्यासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन 

सावनेर/पाटणसांवगी (नागपूर) : नागपूर-बैतुल महामार्गावरील पाटणसावंगी येथील टोल नाका स्थानांतरित करावा, या मागणीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्या नेतृत्वात काल दुपारी पाटणसावंगी टोल नाक्‍यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नागपूर-जबलपूर महामार्गावरील रामटेक तालुक्‍यातील मनसर टोल नाका स्थानांतरित करण्याचा आदेश देतेवेळी पाटणसांवगी टोल नाका स्थानांतरित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सरकारने मनसर टोल नाक्‍याच्या स्थानांतरणाला मंजुरी दिली. मनसर टोल नाका स्थानांतरित झाला. पण पाटणसावंगी येथील टोल नाका अद्याप स्थानांतरित का झाला नाही? असा सवाल करीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारला घराचा आहेर दिला. 

भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्या नेतृत्वात पाटणसावंगी टोल नाक्‍यावर भाजपचे कार्यकर्ते सोमवारी दुपारी बारा वाजता धडकले. टोल नाक्‍याविरोधात नारे देण्यात आले. सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला सारून वाहनांची वाट मोकळी करून दिली. आंदोलकांच्या विरुद्ध टोल नाका संचालकांनी पोलिसात केलेल्या तक्रारीवरून तोडफोड केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आंदोलकांना सावनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांमध्ये अॅड. प्रकाश टेकाडे, अशोक तांदूळकर, रामराव मोवाडे, विलास ठाकरे, दिलीप धोटे, शत्रुघ्न सावरकर, वामन कुंभारे, देवीदास मदनकर, विजय देशमुख, स्मृती ईखार, छाया ढोल, प्रमोद हत्ती, धनराज देवडे, सुरेंद्र शेंडे, तिलक कमाले, प्रमोद पिंपळे, आशीष माटे, संजय जीवतोडे, किशोर बालपांडे, रवी जाधव, उज्ज्वल करडभाजणे यांच्यासह मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्त्यांचा समावेश होता. 

या टोल नाक्‍याचे संचालन खडतकर कन्स्ट्रक्‍शन कंपनी करीत आहे. 29 ऑक्‍टोबर 18 रोजी एनएचएआयचे अधिकारी व केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली होती. त्यावेळी पाटणसांवगी टोल नाका स्थानांतरासाठी निवड केलेल्या जागेचा अडथळा निर्माण झाला होता. त्यावर अद्यापही तोडगा निघाला नसून जागेचा तिढा सुटला असता तर आंदोलनाची गरज पडली नसती, असे आंदोलकांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com