Nagpur Badminton court damaged by political event of P.M. Narendra Modi | Sarkarnama

नागपूर - पंतप्रधानांच्या कार्यक्रमाने बॅडमिंटन कोर्टचा उडाला बट्ट्याबोळ 

सरकारनामा न्यूजब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी हे वुडन कोर्ट उखडण्यात आले. एसपीजीच्या निर्देशामुळे वुडन कोर्ट काढण्यात आले. या संकुलातच मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले होते. तसेच तेथे मोठे क्‍लोज सर्किट टीव्ही लावण्यासाठी खड्डे खोदण्यात आले होते. लोखंडी खांब व ट्रॉलीमुळे वुडन कोर्ट खराब झाले आहे.

नागपूर:   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १४ एप्रिल रोजी  झालेल्या कार्यक्रमामुळे मानकापूर भागातील  इनडोअर स्टेडीयममध्ये बॅडमिंटनच्या पाच वुडन कोर्टचा पार बट्ट्याबोळ उडाला आहे . बॅडमिंटन कोर्टसाठी जर्मनीतून आयात केलेले वूडन फ्लोअरिंग अनेक ठिकाणी उखडले आहे . जवळपास 1 कोटी रुपये खर्च करून हे वुडन कोर्ट तयार करण्यात आले होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नीती आयोगाने आयोजित केलेला डीजीधन मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. नागपुरातील मानकापूर भागातील या इनडोअर स्टेडीयममध्ये बॅडमिंटन व इतर खेळ खेळले जातात. 

 नागपूर शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून  बांधण्यात आलेल्या या जागतिक दर्जाच्या इनडोअर स्टेडियमचे उदघाटन पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०११ मध्ये त्यांच्या हस्ते करण्यात आले होते . 
 
पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी हे वुडन कोर्ट उखडण्यात आले. एसपीजीच्या निर्देशामुळे वुडन कोर्ट काढण्यात आले. या संकुलातच मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले होते. तसेच तेथे मोठे क्‍लोज सर्किट टीव्ही लावण्यासाठी खड्डे खोदण्यात आले होते. लोखंडी खांब व ट्रॉलीमुळे वुडन कोर्ट खराब झाले आहे.

हे कोर्ट खेळण्यासाठी पूर्णपणे निरुपयोगी झाले आहे. या कोर्टच्या दुरुस्तीसाठी आता जवळपास 40 लाख रुपयांची आवश्‍यकता आहे. या नुकसानाची रक्कम निश्‍चित करण्यासाठी शशी प्रभू व पिंगळे अँड पिंगळे कंपनीने अहवाल क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांना दिला आहे.

ही रक्कम राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आता क्रीडा उपसंचालकांनी राज्य सरकारकडे केली आहे. या विभागाला जवळ 40 लाख  रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. या खर्चाची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी क्रीडा विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख