nagpur-bachchu-kadu-abha-pande | Sarkarnama

बच्चू कडू नागपुरातही `प्रहार' करणार? 

राजेश प्रायकर
शुक्रवार, 27 जुलै 2018

आमदार बच्चू कडू `प्रहार' संघटनेचा पाया हळूहळू विदर्भात पसरवित असून नागपुरातही त्यांनी विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. नागपुरातील ज्येष्ठ अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांच्या समर्थनार्थ त्यांनी मेळावा घेतला आहे. आमदार कडू यांच्या या खेळीमुळे कॉंग्रेसपुढे संकट उभे राहू शकते.

नागपूर : आमदार बच्चू कडू `प्रहार' संघटनेचा पाया हळूहळू विदर्भात पसरवित असून नागपुरातही त्यांनी विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. नागपुरातील ज्येष्ठ अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांच्या समर्थनार्थ त्यांनी मेळावा घेतला आहे. आमदार कडू यांच्या या खेळीमुळे कॉंग्रेसपुढे संकट उभे राहू शकते.
 
महापालिकेची सभा, सभेबाहेर नागरिकांच्या सुविधांसाठी सातत्याने लढणाऱ्या अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांना पुढील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. सध्या मध्य नागपुरात लागलेल्या त्यांच्या बॅनरमुळे त्या विधानसभेची तयारी करीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मूळ कॉंग्रेसच्या आभा पांडे 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या लाटेतही त्या अपक्ष निवडून आल्या. 

2002 मध्ये त्या कॉंग्रेसच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. यानंतर त्यांची कारकिर्द अपक्ष म्हणूनच सुरू आहे. गेली अनेक वर्षे त्या महापालिकेत सातत्याने निवडून येत आहेत. मागील 2014 मध्ये त्यांनी मध्य नागपुरातून विधानसभा निवडणूकही लढविली. महापालिका सभागृहात सातत्याने नागरिकांचे प्रश्‍न मांडून त्यावर अधिकाऱ्यांची झडती घेणाऱ्या त्या सध्या तरी एकमेव अशा नगरसेविका आहेत. प्रभागात विकास कामे खेचून आणण्यासाठी त्यांची धडपड सर्वश्रृत आहे. 

मध्य नागपूर मतदारसंघातून 2019 मधील विधानसभेसाठी तयारी आभा पांडे यांनी सुरू केली आहे. सध्या या मतदार संघात त्यांची मोठ्या प्रमाणात लागलेली होर्डिंग, बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांनी आयोजित केलेल्या एका मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांनी हजेरी लावली होती. आमदार कडू `प्रहार' संघटनेचे काही आमदार विदर्भात निवडून आणून एक शक्ती निर्माण करण्याची तयारी करीत आहेत. आमदार कडू यांच्या 'प्रहार'तर्फे पुढील निवडणूक रिंगणात त्या उतरतील, अशी चर्चाही रंगली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख