सेनेचे कृपाल तुमाने, आशिष जयस्वाल भाजपच्या संपर्कात?

शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने व माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी भाजपशी जवळीक वाढविली आहे. पुढील निवडणुकीत युती होणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय गणिते झपाट्याने बदलत असल्याने सेनेच्या काही नेत्यांनी सुरक्षित घर शोधण्याला प्राधान्य दिले आहे.
सेनेचे कृपाल तुमाने, आशिष जयस्वाल भाजपच्या संपर्कात?

नागपूर : शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने व माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी भाजपशी जवळीक वाढविली आहे. पुढील निवडणुकीत युती होणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय गणिते झपाट्याने बदलत असल्याने सेनेच्या काही नेत्यांनी सुरक्षित घर शोधण्याला प्राधान्य दिले आहे. 

पूर्व विदर्भातून शिवसेनेचे कृपाल तुमाने एकमेव खासदार आहेत. यापूर्वी सेनेचे सुबोध मोहिते खासदार म्हणून रामटेक मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सेनेला झटका दिला होता. आता कृपाल तुमाने यांनी भाजपशी संधान बांधल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा सेनेचा खासदार 'शिवबंधन' तोडण्याची शक्‍यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ते भाजपची रामटेकची उमेदवारी घेण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. 

तुमाने यांच्या प्रवेशाला स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध असल्याने गडकरींनी सावध पवित्रा घेतल्याचे समजते. तुमाने यांचा रामटेक मतदारसंघात कोणताही प्रभाव नाही. केवळ मोदी लाटेत ते रामटेकमधून लोकसभेत निवडून आल्याचा युक्तीवाद भाजपच्या नेत्यांनी केल्याचे समजते. 

रामटेक विधानसभेत सलग तीनवेळा निवडून आलेल्या आशिष जयस्वाल यांनाही आता भाजपचे स्वप्न पडू लागले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून भाजपमध्ये वेळेवर आलेले मल्लिकार्जुन रेड्डी निवडून आले. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून रेड्डीही भाजपवर नाराज आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच नाराजीचे सूर सार्वजनिक केले. पेंच धरणातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी न देता नागपूर शहराला देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आमदार रेड्डी यांनी विरोध केला. 

आशिष जयस्वाल यांच्या भाजपच्या जवळीकीमुळे रेड्डी यांनी नाराजीचे सूर व्यक्त केल्याचे समजते. आशिष जयस्वाल यांचा रामटेक मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. जयस्वाल यांना घेण्यास भाजपचे नेतेही इच्छुक असल्याचे समजते. या राजकीय वळणामुळे सेनेला जोरदार झटका बसण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com