आशिषबाबूंचा मतदारसंघ कोणता?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आलेले डॉ. आशिष देशमुख यांच्यासाठी हा पक्ष आता कोणता मतदारसंघ निवडतो, याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आशिषबाबूंचा मतदारसंघ कोणता?

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आलेले डॉ. आशिष देशमुख यांच्यासाठी हा पक्ष आता कोणता मतदारसंघ निवडतो, याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपचे काटोलचे आमदार असताना देशमुखांनी गेल्या वर्षी आमदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसचा "हात' धरला. त्यानंतर त्यांनी नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढण्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यानंतर त्यांनी चंद्रपूरसाठीही तयारी दर्शविली. पण दोन्हीकडे त्यांना लढता आले नाही. मध्यंतरी ते अकोल्यातून लढणार अशीही चर्चा झाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीचा हंगाम त्यांच्यासाठी कोरडा
गेला.

आता विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागल्यामुळे आशिषबाबूंसाठी कॉंग्रेस कोणता मतदारसंघ निवडणार, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

मोदींशी झालेल्या वादानंतर नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि नागपुरातून नितीन गडकरींच्या विरोधात कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली. जय-पराजयाचा विचार न करता पटोलेंचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी कॉंग्रेसने घेतली आहे. तशी ती आशिषबाबूंच्या संदर्भात घेतली जाते काय, हे भविष्यात दिसणार आहे.

2014 च्या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन मंत्री अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणे निश्‍चित दिसते. तसे झाले तर काटोल राष्ट्रवादीसाठी सुटण्याची दाट शक्‍यता आहे. शेजारच्या सावनेरमध्ये कॉंग्रेसचेच सुनील केदार सलग तिसऱ्यांदा आमदार आहेत. दुसरा मतदारसंघ हिंगणा आहे. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री रमेश बंग प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे नागपुरातील कोणत्या तरी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याचा विचार होऊ शकतो. पण, नागपुरातही अनेक दावेदार एकेका जागेसाठी तयार आहेत.

पश्‍चिम नागपुरातून कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, पूर्वमधून अभिजित वंजारी, उत्तरमधून नितीन राऊत, दक्षिण-पश्‍चिममध्ये प्रफुल्ल गुडधे, दक्षिणमध्ये विशाल मुत्तेमवार आणि मध्य नागपुरात माजी मंत्री अनीस अहमद, रमेश पुणेकर, राजू देवघरे इत्यादी नावांची आधीपासून चर्चा आहे. आशिष देशमुखांना यापैकी पश्‍चिम व दक्षिण-पश्‍चिम हे सोयीचे मतदारसंघ आहेत. परंतु, तेथे दावेदार दिग्गज आहेत. अशात भाजपच्या ज्येष्ठांशी पंगा घेऊन कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या आशिषबाबूंचे पुनर्वसन हा पक्ष कसे करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com