आमदार अमोल मिटकरी कोरोना पाॅझिटिव्ह - mla amaol mitkari tested positive for corona | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार अमोल मिटकरी कोरोना पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन 

अकोला : विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तब्येत चांगली असल्याची माहिती ट्विटर करून दिली आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट-निवडणुकीत आमदार मिटकरी यांनी बैठका, सभा घेतल्या. या सभेदरम्यान त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे मोठे नेते देखील होते. या दोन दिवसात मिटकरी हजारो कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. दरम्यान सोमवारी (ता. १९) त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच जे कोणी आपल्या संपर्कात आले असतील त्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन मिटकरी यांनी केले आहे.
------
हे केले ट्विट...
सोमवारी (ता. १९) केलेल्या ट्विट वर मिटकरी म्हणतात, ‘सकाळी थोडा ताप जाणवू लागल्यामुळे मी कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच औषधोपचार घेत आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच जनसेवेत रुजू होईल.

ही पण बातमी वाचा : कुंभमेळ्यावरून येणारे १४ दिवस क्वॉरंटाईन

नागपूर : हरिद्वारमधून कुंभस्नान करून परत येणाऱ्या भाविकांमुळे कोरोना पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने १४ दिवस क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली असून रेल्वेने परत आलेल्या भाविकांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि राहण्याचे ठिकाणाची माहिती पोलिसांनी पुरविणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘सकाळ’ला सांगितले की, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग कठोर परीश्रम घेत आहे. त्याचा भाग म्हणून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे सुरू केले आहे. कोरोनाचे रूग्ण वाढू नये म्हणून गुरूवारी राज्य सरकार काही दिशा-निर्देश जारी करणार आहेत. तसेच संपूर्ण व्यवस्थेवर उच्च न्यायालयाचा ‘वॉच’ आहे. पोलिसांना नव्याने आदेश मिळताच त्या प्रमाणे पोलिस कारवाई करणार आहेत. ते म्हणाले की, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुंभ मेल्यातून परत येणाऱ्या भाविकांबाबत चर्चा झाली. यामध्ये रेल्वेचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. उत्तररेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या २२ ते २५ रेल्वेगाड्या आहेत. यामधून विदर्भातून प्रवाशी येत आहेत. आता रेल्वे स्थानकावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. तसेच बुकिंग केलेल्या प्रवाशांची माहिती पोलिसांना देण्यात येईल. कुंभमेल्यावरून आलेल्या भाविकांना घरात क्वॉरंटाईन राहावे लागेल.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख