एफआयआरमधील ७ कोटीच कसे दिसले, पाटणींच्या ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे काय?

हे जाणून बुजून टारगेट केले जात आहे. माझी चौकशी सुरू केली, ठीक आहे. पण माझ्याच बरोबरीने आमदार पाटणींचीही चौकशी सुरू करा.
एफआयआरमधील ७ कोटीच कसे दिसले, पाटणींच्या ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे काय?
Bhawana Gawali

नागपूर : भाजप नेते खासदार किरीट सोमय्या BJP Leader MP Kirit Somyya यांनी यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी Yavatmal-Washim's MP Bhavana Gawali यांच्या विरोधा तक्रार दिल्यानंतर ईडीने ED आज त्यांच्या रिसोड व शिरपूर येथील पाच संस्थांची चौकशी केली. मी केलेल्या एफआयआरमधील केवळ ७ कोटी रुपयेच त्यांना कसे दिसले? मानोरा-कारंजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी ५०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे मी दिले, पण त्यांची चौकशी का नाही सुरू केली, असे संतापजनक सवाल खासदार गवळी यांनी केले.

खासदार गवळी यांनी भाजपचे वाशीम जिल्ह्यातील कारंजा-मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. पाटणी यांनी वाशीम जिल्ह्यात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्याचे पुरावेही मी दिले होते. पण त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. कारवाई तर दुरच राहिली, पण त्यांची साधी चौकशीही लावण्यात आली नाही. आमदार पाटणींची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी आज माध्यमांसमोर येऊन केली. 

खासदार गवळी म्हणाल्या, मी केलेल्या एफआयआर मधले ७ कोटी रुपयेच त्यांना कसे दिसले. त्या एफआयआरमध्ये मी काय काय नमूद केले आहे, त्यावर ते का नाही बोलले? म्हणजे हे जाणून बुजून टारगेट केले जात आहे. माझी चौकशी सुरू केली, ठीक आहे. पण माझ्याच बरोबरीने आमदार पाटणींचीही चौकशी सुरू करा, ही सरकारला विनंती आहे. त्यांच्या संस्थांची चौकशी सुरू झाल्यानंतर आज त्या माध्यमांसमोर आल्या. साधी नोटीसही न देता थेट चौकशी सुरू करण्यात आली, हा सरळ सरळ अन्याय असल्याचे त्या म्हणाल्या. 

माझ्या संस्थेचा एफआयआर मी स्वतः नोंद केला होता. कारण मला हिशोब लागत नव्हता. एकच मुद्दा पकडून तो ट्विट करायचा आणि राईचा पर्वत करायचा, असा खेळ काही नेत्यांनी मांडला आहे, असा टोला त्यांनी किरीट सोमय्या यांना लगावला आहे. माझ्या शिक्षण संस्थांमध्ये ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत. विद्यादानाचे पवित्र काम होत आहे. या भागाची पाच टर्मची खासदार  म्हणून मी काम करत आहे. मी चांगले काम करत आहे ते त्यांना पाहवत नाही, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सक्तवसूली संचालनालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत ईडीने आज सकाळी ११ वाजता चार पथकात चार ठिकाणी धडक दिली. यामधे रिसोड तालुक्यातील देगाव येथील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाना, दोन शिक्षण संस्था, एक पतसंस्था तसेच मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील एका शिक्षण संस्थेचा समावेश आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ईडीची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून भाजप त्याचा गैरवापर करीत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.