गडकरी साहेब..! ठेकेदार अन् अधिकारी मलाई खात आहेत, यांच्यावरही टाका ना लेटरबॉम्ब..

अकोल्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी यांनी तर बांधकाम विभाग वेठीस धरला आहे. याबद्दल देखील गडकरींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे. नाही तर भाजप काय आणि शिवसेना काय ?
Nitin Gadkari
Nitin Gadkari

अकोला : वाशीम जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाच्या ठेकेदारांना पैसे मागतात. आम्ही कामे कशी करायची, असा प्रश्‍न विचारत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर लेटरबॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली होती. अकोल्यात ठेकेदार अन् अधिकारी मलाई खात आहेत, त्यांच्यावरही टाका ना लेटरबॉम्ब, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रा. धैर्यवर्धन पुंडकर आज येथे म्हणाले. 

वाशीम जिल्ह्यातील महामार्गाच्या कामात शिवसेनेचे नेते अडथळा निर्माण करीत आहेत, असा लेटर बॉम्ब गडकरींनी टाकला. मात्र, त्याच वेळी अकोल्यातील रस्त्यांबाबत चकार शब्दही त्यांनी काढला नाही. तेव्हा गडकरी अकोल्यातील स्वपक्षाच्या लोकप्रतिनिधींनाही असाच एक ‘लेटर बॉम्ब’ टाकून जाब विचारतील का, असा प्रश्न पुंडकर यांनी केला आहे. गडकरींनी शिवसेनेला या निमित्याने आरसा दाखवला, हे योग्यच झाले. परंतु भाजपची सत्ता असलेल्या अकोला महानगरातील सर्वच अपूर्ण रस्ते आणि उड्डाण पूल यांच्या बाबतीत ते चकार शब्दही काढत नाहीत, हे दुर्दैवी आहे. गेले वीस वर्षांपासून भाजपचा खासदार, केंद्रीय मंत्री, चार-चार आमदार आणि महानगरपालिकेत पूर्ण सत्ता व महापौर असलेल्या स्वपक्षाच्या लोकप्रतिनिधींना नितीन गडकरी मात्र मोठ्या मनाने माफ करतात, असेही ते म्हणाले. 

अकोलेकर जनता मात्र आता भाजपला माफ करणार नाही, हे मात्र नक्की आहे. अकोल्यातील अंतर्गत रस्ते आणि महामार्गावरील रस्ते व उड्डाण पूल कित्येक वर्षांपासून अपूर्ण आहेत. अकोला-अकोट, अकोला-वाडेगाव, अकोला-अमरावती महामार्गावर कित्येक निष्पाप लोकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. तरीही ते काम पूर्ण होत नाही. या कामात भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधी अक्षम्य दुर्लक्ष केले असून, अकोल्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे. संबंधित रस्त्यांचे ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी संगनमताने मलाई खात आहेत, असा आरोपही डॉ. पुंडकर यांनी केला. 

अकोल्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी यांनी तर बांधकाम विभाग वेठीस धरला आहे. याबद्दल देखील गडकरींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे. नाही तर भाजप काय आणि शिवसेना काय, दोघेही एकच माळेचे मणी आहेत, अशी शंका आली तर नवल नाही. त्यामुळे  गडकरींनी एक ‘लेटर बॉम्ब’ अकोल्यातील स्वपक्षाच्या लोकप्रतिनिधींना पण टाकावा. म्हणजे किमान अकोला जिल्ह्यातील महामार्गाची अपूर्ण  कामे पूर्ण होतील आणि जनतेला नरकयातनांतून सुटका मिळेल, अशी अकोलेकरांची मागणी असल्याचे डॉ. पुंडकर म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com