अधिवेशनात दिसणार सातारी बाणा 

अधिवेशनात दिसणार सातारी बाणा 

सातारा : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या (बुधवार) पासून नागपूरला सुरू होत आहे. या अधिवेशनात सातारा जिल्ह्यातील आठ आमदार आपले विविध प्रश्‍न व लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृह दणाणून सोडणार आहेत. यामध्ये मेडिकल कॉलेजचा मान्यतेचा प्रश्‍न, सिंचन प्रकल्पांना अपुरा निधी, साताऱ्याची हद्दवाढ, कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरण, स्वच्छ पालिका अभियानातील गैरव्यवहार, जिल्हा बॅंक नोकर भरती घोटाळा, विजेचा प्रश्‍न हे विषय प्रामुख्याने मांडून त्यावरून सरकारला धारेवर धरले जाईल. 

विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रश्‍न मांडण्याची पध्दत ऑनलाइन करण्यात आली आहे. यामुळे आमदारांनी याआधीच प्रश्‍न व लक्षवेधी पाठविल्या आहेत. राज्यातील भाजप, शिवसेना युतीच्या शासनाने गेल्या चार वर्षात सातारा जिल्ह्याला निधी देताना सापत्न भाव ठेवला आहे. त्यामुळे विकास कामांची गती कमी झाली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना जनतेपुढे आपापल्या मतदारसंघात किती कामे केली याचा लेखाजोखा मांडावा लागणार आहे. 

या विकास कामांसाठी निधी पदरात पाडून घेण्यासोबत जिल्ह्यातील प्रमुख प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा ही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे नागपूर येथे होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पाच व कॉंग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार आक्रमक होऊन निधीसाठी प्रलंबित राहिलेल्या विकास कामांबाबत सरकारला धारेवर धरणार आहेत. 

मतदारसंघनिहाय कोणते प्रश्‍न आमदार मांडणार याचा हा लेखाजोखा : 

कऱ्हाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण 

कोयना अभयारण्य व भूकंपग्रस्तांचा प्रश्‍न 
जावळी-पाटण येथील धरणग्रस्त प्रश्‍न 
विमानतळ विस्तारीकरण 
कऱ्हाडची संरक्षण भिंत 
मेडिकल कॉलेज मान्यतेचा प्रश्‍न 
............... 
कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे 
वसना-वांगना प्रकल्पाचे प्रलंबित कामे 
बटाटा संशोधन केंद्राचे पुढे काय 
पुसेगाव व कोरेगाव वळण रस्ता प्रश्‍न 
मेडिकल कॉलेजच्या मान्यतेचा प्रश्‍न 

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले : 
सातारापालिका स्वच्छता अभियान योजनेत गैरव्यवहार 
सातारा शहराची हद्दवाढ 
कारागृह सातारा शहराबाहेर नेणे 
उरमोडीचे उर्वरित पुनर्वसन 
बोंडारवाडी प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता 
लावंघर उपसा सिंचन योजना मान्यता व निधी तरतूद 

कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील 
कृषी पंपाची प्रलंबित विज कनेक्‍शन 
ग्रामीण विजेचे प्रश्‍न, अपुरा निधी 
ग्रामीण रस्त्यांच्या निधीचा प्रश्‍न 
सिंचन प्रकल्पांच्या निधीचा प्रश्‍न 

फलटणचे आमदार दीपक चव्हाण 
शिरवळ-बारामती रस्त्यांचे रखडलेले काम 
शेती पंपाचे प्रलंबित विज कनेक्‍शन 
शिक्षक बदल्यांचा विषय 
मेडिकल कॉलेजच्या मान्यतेचा प्रश्‍न 

माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे 
उरमोडीच्या पाण्याचा प्रश्‍न 
जिहे कटापूर योजनेला निधीच नाही 
जिल्हा बॅंकेची नोकर भरती घोटाळा 
महाबळेश्‍वर-पंढरपूर रस्त्याच्या कामामुळे झालेली दुरवस्था 
मेडिकल कॉलेजच्या मान्यता प्रश्‍न 

पाटणचे आमदार शंभूराज देसाई 
ग्रामीण रस्त्यांसाठी अपुरा निधीचा प्रश्‍न 
राष्ट्रीय पेयजल योजनेचा सुधारित आराखडा करावा 
ग्रामीण व डोंगरी गावांच्या रस्त्यांचा सुधारित आराखडा करावा 
जलसंपदा विभागाला निधी उपलब्ध करण्याचा प्रश्‍न 
शिवशाही बसमध्ये पत्रकारांना मोफत प्रवास सुरू करावा 
पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा प्रश्‍न 


कोणताही महत्त्वाचा प्रश्‍न राहिला नाही : मकरंद पाटील 
वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर मतदारसंघातील विविध विकास कामांना माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध होऊ कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे किसन वीर कारखान्याच्या थकित ऊस बिलाचा प्रश्‍न वगळता इतर कोणताही महत्वाचा प्रश्‍न अधिवेशनात मांडण्यासारखा राहिलेला नाही. तसेच वाई पालिकेची पोटनिवडणुक लागल्याने अधिवेशनात सुरवातीचे दोन चार दिवस थांबून या निवडणुकीसाठी परत येणार आहे, असे वाई-खंडाळा-महाबळेश्‍वरचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com