ठेकेदार बोलतो आमदार जगताप यांच्या पत्रातून  : महापौर सुरेखा कदम 

महापालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. येत्या आठ दिवसांत ही चौकशी पूर्ण होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त घनश्‍याम मंगळे यांनी स्पष्ट केले.
ठेकेदार बोलतो आमदार जगताप यांच्या पत्रातून  : महापौर सुरेखा कदम 
MLA-Jagtap-Mayor-Kadam

नगर  :  महापालिकेत कथित  चाळीस लाखांच्या झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी काल महापालिकेच्या सभेत मोठा गोंधळ झाला. याच दरम्यान कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्रक सभागृहात वाटण्यात आले.

 ते पत्रक नगरसेवक संजय घुले यांनी वाचायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा गोंधळ सुरू झाला. या वेळी हस्तक्षेप करीत शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी आमदारांना लक्ष्य करीत "ठेकेदार बोलतो, तेच पत्रकामधून हे सांगतात,'' असे सांगितल्याने या गोंधळात भरच पडली. ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी भाषणातून वरील गैरप्रकाराची चौकशी झाली नाही, तर कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. 

प्रभाग क्रमांक एक व 28 मध्ये वीस ठिकाणी  पोलवर पथदिव्यांची कामे झाल्याचे भासवून पन्नास लाखांचा अपहार केल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी केला. तसे पुरावे त्यांनी सादर करून बनावट सही झाल्याचे त्यांनी दाखवून दिले. या विषयावरून शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत प्रचंड गदारोळ झाला. 

बनावट सही करून हा गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने सहा अधिकाऱ्यांना सभेच्या बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये लेखाधिकारी, शहर अभियंता, विद्युत विभागप्रमुख, प्रभावी उपायुक्त आदींचा समावेश होता. सभेत झालेल्या गोंधळामुळे सभा तहकूब करून ही सभा काल पुन्हा घेण्यात आली. या विषयावर सभेच्या सुरुवातीलाच पुन्हा गोंधळ सुरू झाला. 

संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली. याच दरम्यान दीप चव्हाण यांचे भाषण सुरू असताना घुले उठले. त्यांनी आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र वाचून दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर महापौर कदम यांनी सदर पत्र हे ठेकेदार जे बोलतो, तेच त्यामध्ये आहे. त्यामुळे ते वाचण्याची गरज नाही, असे सांगून पुढील कामकाज सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आमदार जगताप व महापौर कदम यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पुन्हा वाढतील, अशी स्थिती निर्माण झाले आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र महापौरांच्या जिव्हारी 

महानगरपालिकेत विकास कामे व बजेट रजिस्टरातील फेरबदल गैरव्यवहाराची शासनस्तरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. 

त्या पत्रात म्हटले आहे, की महापालिकेत मोठा गैरव्यवहार झाला असताना आयुक्तांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. तसेच या प्रकरणात महापौर कार्यालयाचा संबंध असल्याचे संबंधित ठेकेदारानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणात मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्‍यता आहे, असेही अधोरेखीत होते, असे जगताप यांनी पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, या पत्राचा आशय संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी, असा असला, तरी महापौरांचे कार्यालयाचाही त्याशी संबंध असल्याचे त्यांनी अधोरेखित केल्याने हे पत्र महापौरांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जाते. 

 आठ दिवसांत चौकशी

महापालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. येत्या आठ दिवसांत ही चौकशी पूर्ण होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त घनश्‍याम मंगळे यांनी स्पष्ट केले. पण चौकशी समिती पुर्वीचीच नेमली असून, सखोल चौकशी होणार नाही. या घटनेला आठ दिवस झालेले आहेत. पुन्हा आठ दिवसांची कशाला वाट पाहता, असे नगरसेवकांनी ठणकावून सांगितले. 

गैरव्यवहारप्रकरणी तातडीने चौकशी झाली नाही, तर कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी देताच त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी पाठिंबा दर्शवित राष्ट्रवादीही त्यामध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.