जिल्हाधिकारी द्विवेदी, पोलिस अधीक्षक शर्मा यांचे निर्णय नगरकरांना भावले; मात्र राजकीय मंडळींना जिव्हारी लागले

प्रसंगावधान राखून केलेले योग्य नियोजन, दोन्ही अधिकाऱ्यांमधील उत्कृष्ठ समन्वय यामुळे गणेशोत्सव व मोहरम या दोन्ही मिरवणुका शांततेत पार पडल्या. याबद्दल नागरिकांमधून जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर त्याचे प्रतिबिंब पडत आहे. हे निर्णय नगरकरांना भावले असले, तरी राजकीय मंडळींच्या मात्र जिव्हारी लागले.
जिल्हाधिकारी द्विवेदी, पोलिस अधीक्षक शर्मा यांचे निर्णय नगरकरांना भावले; मात्र राजकीय मंडळींना जिव्हारी लागले

नगर : प्रसंगावधान राखून केलेले योग्य नियोजन, दोन्ही अधिकाऱ्यांमधील उत्कृष्ठ समन्वय यामुळे गणेशोत्सव व मोहरम या दोन्ही मिरवणुका शांततेत पार पडल्या. याबद्दल नागरिकांमधून जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर त्याचे प्रतिबिंब पडत आहे. हे निर्णय नगरकरांना भावले असले, तरी राजकीय मंडळींच्या मात्र जिव्हारी लागले.

दोन्ही उत्सव  शांततेत पार पाडल्याबद्दल शर्मा व द्विवेदी यांचा प्रेस क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी हे दोन्ही उत्सव सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळेच शांततेत झाले, असे सांगत नागरिकांना याचे श्रेय दोघांनीही दिले.

दरम्यान, नगरमधील गणेशोत्सव कायम चर्चिला जातो. पुण्यात असलेल्या देखाव्यांसारखेच देखावे नगरमध्ये बनविले जातात. त्यामुळे जिल्हाभरातून ग्रामस्थ गणपती पाहण्यासाठी नगर शहरात आवर्जून येतात. तसेच विसर्जन मिरवणूकही तितकीच आकर्षक असते. शहरात तेरा मानाचे गणपती मंडळे आहेत. त्यांचे नंबर ठरलेले असतात. शहराचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपतीचा रथ सर्वांच्या पुढे असतो. त्यामागे हे मंडळ भव्य-दिव्य देखावे सादर करीत येत असतात. दरवर्षीचे हे चित्र असते. या वर्षी मात्र अनेक निर्बंध घातल्याने देखावे अत्यल्प होते. तसेच मंडळांनीही मिरवणुकीवर बहिष्कार घातल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत चार-पाच मंडळे सहभागी झाले होते. साहजिकच विसर्जन मिरवणूक काहीशी थंडच होती. मोहरमची भव्य मिरवणूक ही राज्यभरात कौतुकाचा विषय असतो. हा उत्सवही गणेशोत्सवात आल्याने दोन्ही समाजात काहीशी गडबड होण्याची भिती नागरिकांमधून होती. तथापि, शर्मा व द्विवेदी यांनी केलेल्या नियोजनामुळे दोन्ही मिरवणुका शांततेत पार पडल्या.

असा केला बंदोबस्त
सुमारे चार हजार पोलिसांचा फौजफाटा घेवून शर्मा यांनी मिरवणुकीचे नियोजन केले. त्यांना स्वयंसेवकांचीही साथ होती. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार नगरमधील गुन्हेगारीशी संबंधित असलेल्या सुमारे तीनशे लोकांना शहर बंदीच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यातील काही लोकांवर कारवाईही झाली. त्यामुळे या दोन्ही उत्सवादरम्यान समाजाला चिथावणी देणारी मंडळी दूर राहिली. गणपती बसविताना मंडळांना काही बंधणे लादण्यात आली. मोहरम मिरवणुकीच्या मार्गावरील गणेशमंडळांना मंडप लहान करण्यास भाग पाडले. याला शिवसेनेच्या नेत्यांनी मोठा विरोध केला, परंतु प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. मोठ्या मंडळांवर कारवाई केल्यामुळे लहान मंडळांनी आपोआप मंडप काढून घेतले. तसेच अनधिकृत मंडळांना रस्त्यावर गणपती बसू दिले नाहीत. त्यामुळे परवानगी घेण्याच्या आगोदरच अनेक मंडळे गायब झाली. साहजिकच पोलिसांवरील हा ताणही काहीसा निवळला. मोहरम मिरवणुकीदरम्यान वेळ ठरवून दिली होती. कोणत्या ठिकाणी किती वेळ मिरवणूक थांबेल व समारोपाची वेळही ठरवून दिली. त्याची अंमलबजावणी काटेकोर केल्याने ही मिरवणूक शांततेत झाली. गणपती मंडळांनाही विसर्जन मिरवणुकीची वेळ व ठिकाण ठरवून दिली होती. वेळेपेक्षा जास्त वेळ मंडळाला थांबू दिले जात नव्हते. साहजिकच मंडळांमधील वाद होण्याचा प्रश्नच येत नव्हता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाच्या निकालानुसार डिजेला बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली. साहजिकच दणदणाट झाला नाही.

विधानसभा जवळ आली तरीही नेते गप्प
विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव जोरदार व भव्यदिव्य होईल, अशी शक्यता असताना गणेशोत्सवातील बंधनांमुळे नेतेमंडळी खूपसे रस्त्यावर आले नाहीत. दरवर्षीप्रमाणे ढोल हाती घेवून बडविण्याची संधी या वेळी मात्र बहुतेक नेत्यांनी सोडली. याबरोबरच मागील वर्षभरापासून झालेल्या काही राजकीय घडामोडी, घटनांचे सावटही मिरवणुकीवर होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com