देवेंद्र फडणवीस शंकरराव गडाखांवर भडकले... म्हणाले हीच का शिवशाही? - devendra fadnavis criticizes minister Shankarrao Gadkah Patil | Politics Marathi News - Sarkarnama

देवेंद्र फडणवीस शंकरराव गडाखांवर भडकले... म्हणाले हीच का शिवशाही?

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

नेवासे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस नेला नसल्याची तक्रार...

पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मत न देणाऱ्या शेतकऱ्याचा ऊस तोडणीला न नेण्याचा प्रताप गडाखांच्या मुळा कारखान्याने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

नेवासे तालुक्यातील सुमारे एक हजार शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्याने नेला नसल्याबद्दल काहींनी आपला ऊस पेटवून देऊन त्याचे फेसबुक लाइव्ह केले. तो व्हिडीओ शेअर करत फडणवीस यांनी गडाख यांच्यावर तोफ डागली.

``दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्‍या शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्‍या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही,``असा सवाल त्यांनी विचारला आहे.

``आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्‍यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्‍यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्‍यांनी जगायचेच नाही. मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून हा प्रताप चालविलाय्, नेवास्यात शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत या शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, ही माझी माफक अपेक्षा आहे.किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका, असे आवाहन त्यांनी केले. 

याबाबत शंकरराव गडाख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. त्यांची बाजू समजली की ती स्वतंत्रपणे दिली जाईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख