सुप्रिया सुळे यांचे हात बळकट करणार : राजश्री घुले 

संसाराचा गाडा जसा पती-पत्नीच्या एकविचारानेच सुरू असतो, तसाच काहीसा प्रकार महिला पदाधिकाऱ्यांच्याही बाबतीत होतोच. पतीशी चर्चा करून अनेक निर्णय घेतले जातात. त्यात वावगे काहीच नाही.
rajashri-gule
rajashri-gule

नगर : मिळालेल्या संधीचे सोने करण्यात महिला कमी पडत नाहीत. त्यामुळे आपल्या अध्यक्षपदाच्या काळात नगरच्या जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविण्यावर भर देणार आहोत. महिला पदाधिकारी कुठेही कमी नाही, हेच दाखवून देणार असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले.

आगामी काळात खासदार सुप्रिया सुळे यांचे हात बळकट करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण महिला सक्षम झालेली दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्याशी चर्चा करताना अनेक विषयांना त्यांनी स्पर्श करीत महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

प्रश्न : महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही कसे प्रयत्न करता?
उत्तर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कणखर भूमिकेमुळे महिलांना राजकारणात आरक्षण मिळाले, त्यामुळे अनेक माता-भगिनी सरपंच पदापासून सभापती, महापौर, जिल्हापरिषद अध्यक्ष अशा अनेक पदावर काम करताना दिसतात. सध्या महिला बऱ्यापैकी सक्षम झाल्या आहेत. परंतु महिला आत्मनिर्भर व्हावी, असाच आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टिकोणातून आम्ही जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभाग, महिला बालकल्याण विभाग या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहोत. बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना विकास व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न आहेत.  खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला बचत गटांना प्रोत्सान देण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत. महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्यावतीने यापूर्वी कराटे प्रशिक्षण तालुकास्तरावर आयोजित केले होते. त्याद्वारे महिला सशक्त होण्यास मदत होत आहे. सुळे यांनी बचत गटासाठी उभी केलेल्या चळवळीची प्रेरणा म्हणूनच शासनाच्या विविध योजनांची कामे बचत गटाकडे दिली जात आहेत. 

प्रश्न : आगामी काळात महिलांसाठी कोणते उपक्रम करणार आहात?
उत्तर : यापूर्वी तीन वर्षे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते आणि आता अध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा खोल्या, अंगणवाडी इमारत, आरोग्य केंद्रासाठी इमारती याला प्राधान्य दिले आहे. जिल्हापरिषदेला कायम कमी निधी मिळायचा, म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा जास्त निधी मिळविला आहे.  

प्रश्न : अजूनही महिला पदाधिकाऱ्यांचे निर्णय पुरुष घेतात का?
उत्तर : असे नाही म्हणता येणार. कारण महिलांची निर्णयक्षमता वाढली आहे. पूर्वीही होती, आता मात्र त्यांचे वर्चस्व वाढत आहे. बहुतेक गावांमध्ये महिला सरपंचांचे पती त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करतात, असा आरोप होतो. हे काही अंशी खरे असले, तरी त्यातून महिला पदाधिकारी बाहेर पडत आहेत. स्वतःचे निर्णय त्या स्वतःच घेत आहेत. संसाराचा गाडा जसा पती-पत्नीच्या एकविचारानेच सुरू असतो, तसाच काहीसा प्रकार महिला पदाधिकाऱ्यांच्याही बाबतीत होतोच. पतीशी चर्चा करून अनेक निर्णय घेतले जातात. त्यात वावगे काहीच नाही.

प्रश्न : अत्याचारांच्या घटनांबाबत काय सांगाल?  
उत्तर : हल्ली महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसते, हे खरे आहे. परंतु नुकत्याच झालेल्या अर्थसंल्पात महिला अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्त्रियांवरील अत्याचार कमी होण्यास मदतच होणार आहे. महिलांना न्याय मिळण्यासाठी अनेक कायदे आहेत. परंतु त्याचा गैरवापर होण्याचे प्रकारही दिसून येत आहे. महिलांनी दिलेली तक्रार नोंदवून घेतली जात असली, तरी काही मंडळी महिलांना पुढे करून गुन्हेगारी क्षेत्रात त्याचा वापर करताना दिसतात. अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत. महिलांच्या कायद्याचा गैरवापर झाल्याच्या काही घटना होतही असतील, परंतु तरीही अत्याचाराबाबत अजूनही कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.  

प्रश्न : पदाधिकारी म्हणून काम करताना कुटुंबाची कशी मदत होते ?
उत्तर : स्व. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचा राजकीय वारसा आमचे घुले पाटील कुटुंबिय चालवत आहे. खासदार शरद पवार यांच्या प्रेरणेने जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या जबाबदारी माझ्याकडे आली, ती मी भक्कमपणे सांभाळत आहे. कामाचे नियोजन, ऑफिस यासाठी स्वतंत्र वेळ असल्याने मी देते. कौटुंबिक जबाबदारीसाठी आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य मला खूप मदत करतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com