नगर झेडपी अध्यक्षपद महिलांसाठी : शालिनी विखे पुन्हा रिंगणात की नवीन चेहरा मिळणार?

नगर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 73 आहे. मात्र एक सदस्य डॉ. किरण लहामटे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांची जागा रिक्त होऊन आता सदस्यसंख्या 72 असेल.
nagar zp president reserved for woman
nagar zp president reserved for woman

नगर : नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले असल्याने पुन्हा  शालिनी विखे पाटील यांना संधी मिळेल, की थोरात व  पवार गटाचा अध्यक्ष होणार, या पदावर कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार होण्याचे घटक आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा परिषदेतही हाच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या समन्वयाने जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे. या निवडीमध्ये भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना दूर ठेवून निवड होण्याची शक्यता आहे.

सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या शालिनी विखे पाटील आहेत. मात्र विखे पाटील अध्यक्षपदी विराजमान झाल्या, त्या वेळी त्यांचे पती व ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हेही कॉंग्रेसमध्ये होते आणि विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते.

मात्र या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्याच तिकिटावर ते खासदारही झाले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजयीही झाले. पती आणि पुत्र दोघेही भाजपमध्ये गेले असले, तरी शालिनी विखे पाटील यांनी मात्र कॉंग्रेस पक्ष सोडला नाही. त्यामुळे यंदा त्या पुन्हा कॉंग्रेसतर्फे अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरणार, की कॉंग्रेस पक्ष अन्य सदस्याला अध्यक्षपदी संधी देणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही यंदा अध्यपदाची संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदासाठी 2001 पासून अनुसूचित जातीसाठी एकदा, नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी एकदा, महिलेसाठी एकदा तसेच सर्वसाधारण महिलेसाठी एकदा आरक्षण निघाले होते. मागील आरक्षणावरून या वेळी कोणते आरक्षण निघणार याबाबत आडाखे बांधून त्यावर चर्चा केली जात होती. जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत आज मंगळवारी लकी ड्रॉ पद्धतीने मंत्रालयात काढण्यात आली.

जिल्हा परिषदेत 39 महिला सदस्य
नगर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 73 आहे. मात्र एक सदस्य डॉ. किरण लहामटे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांची जागा रिक्त होऊन आता सदस्यसंख्या 72 असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या 50 टक्के आरक्षणानुसार 37 महिलांना सदस्य म्हणून स्थान मिळालेले आहे. त्यातच सर्वसाधारण जागांवर आणखी दोन महिला जिल्हा परिषदेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे महिला सदस्यांची संख्या 39 आहे. यंदा अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निघालेले आहे. आता आरक्षण काय निघणार यावरील चर्चा पूर्ण थांबली असून, अध्यक्ष कोण होणार याबाबतच सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com