घुले आमदार झाले तर ढाकणेंच्या घरात झेडपी अध्यक्षपद! - nagar zp president post politics | Politics Marathi News - Sarkarnama

घुले आमदार झाले तर ढाकणेंच्या घरात झेडपी अध्यक्षपद!

मुरलीधर कराळे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

संख्याबळात राष्ट्रवादीचाच वरचष्मा असल्याने उपाध्यक्षा राजश्री घुले किंवा सदस्य प्रभावती ढाकणे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते.

नगर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार आल्यामुळे नगरच्या जिल्हा परिषदेतील राजकारणही बदलले आहे. संख्याबळाअभावी भाजपला दावा करता येणार नाही. त्यामुळे अध्यक्षपदाचा निर्णय मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार रोहित पवार घेणार आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी राजश्री घुले या सध्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत. अध्यक्षपदासाठी त्यांनाच संधी मिळावी, असा सूर राष्ट्रवादीच्या गोटात असलातरी चंद्रशेखर घुले यांचे बंधू माजी आमदार नरेंद्र घुले यांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांना विधानपरिषदेत घेतल्यास एकाच घरात दोन मोठी पदे देण्याची शक्यता नाही.  विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अधिक जागा मिळण्यासाठी घुले बंधुंनी प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांना कोणतेतरी पद देऊन त्यांचे पुनर्वसन होणे स्वाभाविक आहे. घुले कुटुंबियांत दोन्हीपैकी एक पद निश्चित मानले जात आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस  प्रताप ढाकणे यांनी शेवगाव-पाथर्डीमधुन उमेदवारी केली होती. त्यांना थोड्या मतांनी पराभव स्विकारावा लागला.  ढाकणे यांचे वडील बबनराव ढाकणे व शरद पवार यांचे स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे ढाकणे परिवाराचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शरद पवार मदत करतील, हे निश्चित आहे. ढाकणे यांना आमदार होता आले नाही, परंतु त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रभावती ढाकणे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी अपेक्षा पक्षाच्या एका गोटातून व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांनी मोर्चेबांधणी केल्याचे समजते. राजश्री घुले अध्यक्ष होऊ शकल्या नाहीत, तर प्रभावती ढाकणे यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख