nagar zp election | Sarkarnama

नगरमध्ये कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 मार्च 2017

नगर ः पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. जिल्ह्यातील 14 पैकी चार पंचायत समित्यांवर भाजपचे सभापती, तीनवर कॉंग्रेसचे, तीन राष्ट्रवादी, तर दोन समित्यांवर शिवसेनेचे सभापती झाले. महाआघाडी व क्रांतिकारी शेतकरी पक्षाला प्रत्येकी एक-एक पंचायत समितीवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याचा बुरूज ढासळल्याचे हे स्पष्ट चिन्ह आहे. जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेसने 23 जागा मिळवून गड शाबूत ठेवला असला, तरी भाजपने 14 जागा मिळवून घेतलेली मुसंडी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला विचार करायला लावणारी ठरली.

नगर ः पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. जिल्ह्यातील 14 पैकी चार पंचायत समित्यांवर भाजपचे सभापती, तीनवर कॉंग्रेसचे, तीन राष्ट्रवादी, तर दोन समित्यांवर शिवसेनेचे सभापती झाले. महाआघाडी व क्रांतिकारी शेतकरी पक्षाला प्रत्येकी एक-एक पंचायत समितीवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याचा बुरूज ढासळल्याचे हे स्पष्ट चिन्ह आहे. जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेसने 23 जागा मिळवून गड शाबूत ठेवला असला, तरी भाजपने 14 जागा मिळवून घेतलेली मुसंडी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला विचार करायला लावणारी ठरली. आता पंचायत समित्यांमध्येही भाजपची सरशी झाल्याने कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याचे दिसून आले आहे. 

कर्जत व श्रीरामपूर येथे सदस्य संख्या समान असल्याने चिठ्ठी टाकून महाआघाडी आणि भाजपला सभापतिपद मिळाले. नगर तालुक्‍यात शिवसेनेने तिसऱ्यांदा सभापतिपद स्वतःकडे खेचण्यात यश मिळविले. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने काही तालुक्‍यात मैत्रिपूर्ण लढती केल्या असल्या, तरी भाजपने घेतलेली मुसंडी जिल्ह्यात महत्त्वाची मानली जाते. 

श्रीगोंदे, कर्जत, जामखेड व पाथर्डी पंचायत समित्यांमध्ये भाजपचे सभापती झाले आहेत. याआधी भाजपकडे तीन पंचायत समित्या होत्या. त्यांत एकाने वाढ झाली.

कॉंग्रेस व "राष्ट्रवादी'ची प्रत्येकी तीन पंचायत समित्यांमध्ये सत्ता आली आहे. त्यांची एकहाती असलेली सत्ता घटल्याने या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याची स्थिती आहे. 
कॉंग्रेसने राहाता, संगमनेर व पारनेरमध्ये सभापतिपद मिळविले असले, तरी इतर तालुक्‍यांत त्यांना ताकद लावता आली नाही. "राष्ट्रवादी'ला शेवगाव, राहुरी व कोपरगावात संधी मिळाली. अकोल्यात फोडाफोडीमुळे शिवसेनेला प्रथमच भगवा फडकविण्याची संधी मिळाली. मागील वेळी शिवसेनेकडे दोन पंचायत समित्या होत्या, ती संख्या कायम राहिली. क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नेवासे व स्थानिक महाआघाडीने श्रीरामपुरात सत्ता काबीज केली. "राष्ट्रवादी'ला रामराम ठोकून स्वतंत्र क्रांतिकारी पक्षाच्या माध्यमातून गडाख कुटुंबीयांनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.

पारनेरमध्ये त्रिशंकू अवस्था होती; मात्र कॉंग्रेस-"राष्ट्रवादी' आघाडीचा निर्णय झाल्याने तेथे त्यांना सत्ता मिळाली. श्रीगोंद्यात भाजपने "राष्ट्रवादी'कडून सत्ता हिसकावली. त्यामुळे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची ताकद अधिक वाढली आहे. जामखेडमध्ये भाजपने सत्ता कायम राखत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची पकड शाबूत ठेवली आहे. पाथर्डीतही भाजपची सत्ता आल्याने आमदार मोनिका राजळे यांचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. शेवगावमध्ये डॉ. क्षितिज घुले यांच्या रूपाने घुले कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात आली आहे. राहाता व संगमनेरात अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसचीच सत्ता आली. 

पंचायत समित्यांत पक्ष व निवड झालेले सभापती - उपसभापती (अनुक्रमे) असे ः 
1) नगर तालुका (शिवसेना) ः रामदास भोर, कांताबाई कोकाटे 2) पारनेर (आघाडी) ः राहुल झावरे, दीपक पवार. 3) श्रीगोंदे (भाजप) ः पुरुषोत्तम लगड, प्रतिभा झिटे. 4) कर्जत (भाजप-सेना) ः पुष्पा शेळके, प्रशांत बुद्धिवंत. 5) जामखेड (भाजप) ः सुभाष आव्हाड, राजश्री मोटे. 6) पाथर्डी (भाजप) ः चंद्रकला खेडकर, विष्णूपंत अकोलकर. 7) शेवगाव (राष्ट्रवादी) ः क्षितिज घुले, शिवाजी नेमाणे. 8) नेवासे (क्रांशेप) ः सुनीता गडाख, राजनंदिनी मंडलिक. 9) राहुरी (राष्ट्रवादी) ः मनीषा ओहोळ, रवींद्र आढाव. 10) श्रीरामपूर (महाआघाडी) ः दीपक पटारे, बाळासाहेब तोरणे. 11) राहाता (कॉंग्रेस) ः हिराबाई कातोरे, बाबासाहेब म्हस्के. 12) कोपरगाव (राष्ट्रवादी) ः अनुसया होन, अनिल कदम. 13) संगमनेर (कॉंग्रेस) ः निशा कोकणे, नवनाथ आरगडे. 14) अकोले (शिवसेना) ः रंजना मेंगाळ, मारुती मेंगाळ. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख