नगरमध्ये अटीतटीची लढाई होईल ? 

Satyajeet Tambe - Sangram Jagtap
Satyajeet Tambe - Sangram Jagtap

नगर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप नगर शहर विधानसभा मतदारसंघातून  नेतृत्व करत आहेत. ते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. तशी नगरमध्ये जोरात चर्चा आहे.

तशी शक्‍यता वाटत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून माजी महापौर अभिषेक कळमकर व युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे तयारी करत आहेत. आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीच्याच कोट्यात आहे. तथापि, कॉंग्रेसमधून सत्यजित तांबे किंवा माजी नगरसेवक निखिल वारे देखी इच्छुक आहेत.

भाजप-शिवसेना महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेच्या कोट्यात आहे. मात्र, भाजपने येथून प्रबळ दावा केला असून, माजी खासदार दिलीप गांधी व त्यांचे चिरंजीव सुवेंद्र तसेच माजी नगरराध्यक्ष अॅड. अभय आगरकर, महापौर बाबासाहेब वाकळे देखील उमेदवारीवर दावा सांगत आहेत. शिवसेनेतर्फे माजीमंत्री अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. तथापि, शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, पक्षाचे माजी शहराध्यक्ष संभाजी कदम व माजी महापौर शीला शिंदे यांनीही पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे.


कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपतर्फे पालकमंत्री राम शिंदे सध्या नेतृत्व करत आहेत. येथून त्यांच्यापुढे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यात स्थानिक व बाहेरचा, असा वाद उभा करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. रोहित पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधूनच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मुंजषा गुंड यांचे आव्हान आहे. पालकमंत्री शिंदे यांच्यासमोरही भाजपमधूनच कर्जतमधील नेते नामदेव राऊत यांनी आव्हान दिले आहे.

त्यांनी काल घेतलेल्या मेळाव्यातून केलेले शक्तीप्रदर्शन डोकेदुखी वाढविणारे ठरेल. कॉंग्रेसतर्फे येथून मीनाक्षी साळुंके इच्छूक आहेत. मात्र, जागाच राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याने त्यांच्या गटात फार धावपळ दिसत नाही. या मतदारसंघातून वंचित आघाडीचा जोरही असेल. अॅड. अरुण जाधव त्यांचे उमेदवार असतील.



श्रीगोंदे मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट लक्ष्य पुरविल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप विजयी झाले. त्यावेळी बबनराव पाचपुते यांच्या विरोधकांची मोट बांधण्यात पवार यशस्वी झाले होते. यावेळी तशी परिस्थिती होईल, अशी शक्‍यता खूपच कमी आहे. त्यात आमदार जगताप भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून संधी मिळेल, अशी घन:श्‍याम शेलार यांना अपेक्षा आहे.

कॉंग्रेसचे नेते राजेंद्र व अनुराधा नागवडे येथून विधानसभेचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याशी भाजपचा संपर्क सुरु असल्याने भाजपमधून लढण्यास इच्छूक असलेल्या बबनराव पाचपुते यांच्या गोटात अस्वस्थता आहे. शिवसेनेचे अस्तित्व या मतदारसंघात नगण्य आहे. मागील वेळी शिवसेनेतर्फे शशिकांत गाडे यांनी येथून निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांचा गट अत्यंत शांत भूमिकेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com