विखे पाटलांच्या लोणीत भाजप-शिवसेनेत काय बरं `शिजलं` - Vikhe Patil's butter is cooked well in BJP-Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

विखे पाटलांच्या लोणीत भाजप-शिवसेनेत काय बरं `शिजलं`

मुरलीधर कराळे
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

मंत्री सत्तार व आमदार विखे पाटील यांच्यात बराच वेळ खलबते झाले. पंचायत समितीच्या इमारतीच्या उदघाटनाचे निमित्त होते. या दोन नेत्यांत काय बरं चर्चा झाली, याकडे धुरिणांचे लक्ष लागले आहे.

नगर : महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेवर भाजप नेते सडेतोडपणे टीका करताना `लवकरच सत्तेत येणार`, असे ठामपणे सांगत आहेत. अशातच लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरी शिवसेनेेचे नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज स्नेहभोजन घेतले. त्यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. या चर्चेत काय बरं शिजलं, हे मात्र गुलदस्त्यात राहिले.

कर्डिले यांची `टोपी` फिरू शकते ?

नगर जिल्ह्यातील एक मुरब्बी भाजपनेते शिवाजी कर्डिले यांनी काही दिवसांपूर्वी डिसेंबरअखेर भाजप सत्तेत येणार, असे सुतोवाच करून राजकीय बाॅंब टाकला होता. त्यामुळे भल्या-भल्यांच्या नजरा राजकीय घडामोडींकडे लागल्या. कारण कर्डिले बोलतात, म्हणजे पक्षांतर्गत काहीतरी शिजतं आहे, हे निश्चित असते. तब्बल 25 वर्षांचा आमदारकीचा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी त्यांच्या वक्तव्याने अनेक राजकीय घडामोडींना जन्म दिलेला आहे. त्यांची `टोपी` फिरली, की मोठ्या घडामोडी होतात, असा राजकीय अनुभव आहे. सध्याच्या नव्या घडामोडींत त्यांची ही `टोपी` फिरली की काय, असाच राजकीय कयास आहे. 

कर्डिले यांच्या पाठोपाठ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही याच वाक्याचा पुनरुच्चार केला होता. लवकरच भाजप सत्तेत असेल, असे सांगून त्यांनी कर्डिले यांच्या मताला पुष्टी दिली होती. राज्याच्या पातळीवर तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस `मी पुन्हा येणार` असे कायमच सांगत आहेत. नुकतेच फडणवीस यांनी मुंबईतील भाजपच्या बैठकित महाविकास आघाडीचे आणि विशेषतः काॅंग्रेसची लक्तरे वेशिवर टांगली होती. या भाषणात त्यांनी शिवसेनेवर मात्र टीका करण्याचे खुबीने टाळलेले दिसून आले.

`म्हणून` काॅंग्रेसचा बहष्कार ?

या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार व आमदार राधाकृष्ण विखे पाटील एका व्यासपीठावर होते. श्रीरामपूर येथे पंचायत समितीच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते एकत्र आले असले होते. या कार्यक्रमात काॅंग्रेस सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. शिवसेनेचे नेते भाजपच्या नेत्यांशी जवळीक करून का बरं एकत्र येतात, याचाच कदाचित त्यांचा रुसवा असावा, असे म्हणण्यास वाव आहे. किंवा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना या कार्यक्रमाला बोलावले नसल्याचा त्यांना राग असेल. प्रत्यक्षात या इमारतीसाठी मिळालेल्या निधीचे श्रेय भाजपने घेऊ नये, असे त्यांचे म्हणणे होते. सत्तेत असलेल्या शिवसेना-काॅंग्रेस नेत्यांची प्रमुख उपस्थिती आवश्यक असताना भाजप नेत्याची उपस्थिती डोळ्यात अंजन घालणारी ठरली. शिवसेना नेत्यांची प्रमुख उपस्थिती असताना भाजप नेते तेथे प्रमुख `यजमान` असतात कसे, असेच काहीसे वातावरण तयार झाले.

सत्तार-विखे यांच्यात खलबते

मंत्री सत्तार व आमदार विखे पाटील यांच्यात बराच वेळ खलबते झाले. पंचायत समितीच्या इमारतीच्या उदघाटनाचे निमित्त होते. या दोन नेत्यांत काय बरं चर्चा झाली, याकडे धुरिणांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघेही काॅंग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांची मैत्री असणे स्वाभाविकच आहे. निवडणुकीनंतर दोघांनीही दोन वेगवेगळ्या पक्षात पक्षांतर केले. मात्र त्यांच्या विचारांचे `पक्षांतर` नव्हे, `एकत्रीकरण` झालेले आहे. आगामी काळात भाजप-शिवसेनेचे सत्तेसाठी काही घाटत आहे का, विखे पाटलांना शिवसेनेचे निमंत्रण आहे का, अशा अनेक चर्चांना आता उदाण आले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख