रोहित पवारांचे वादळ थांबविण्यासाठी प्रा. शिंदे यांना डाॅ. विखे पाटलांची ढाल

प्रा. शिंदे व खासदार विखे पाटील यांचेएकमेकांना पेढे भरवितानाचे छायाचित्र नुकतेच समाज माध्यमामध्ये प्रसारीत झाले. त्यामुळे भल्या-भल्यांच्या भुवया उंचावल्या.
rohit pawar and vikhe and shinde.png
rohit pawar and vikhe and shinde.png

नगर : भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची एकहाती सत्ता असलेल्या जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे रोहित पवार यांनी विजयश्री खेचून आणली. शिंदे यांच्या हातची सत्ता गेली. त्यानंतरही काही संस्थांवर पवार यांचेच वर्चस्व सिद्ध झाले. आता आमदार रोहित पवारांचे वादळ शमविण्यासाठी प्रा. शिंदे यांनी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांची ढाल केलेली दिसते. ऐकेकाळी पक्षांतर्गत एकमेकांना विरोध करणारे शिंदे - विखे पाटील हे दोन्ही नेते आता मनाने एक झाल्याचे मानले जातात.

प्रा. शिंदे व खासदार विखे पाटील यांचे एकमेकांना पेढे भरवितानाचे छायाचित्र नुकतेच समाज माध्यमामध्ये प्रसारीत झाले. त्यामुळे भल्या-भल्यांच्या भुवया उंचावल्या.

आमदार पवार यांना शह देण्यासाठी प्रा. शिंदे यांच्यासमोर सध्या तरी दुसरा पर्याय नसल्याचे राजकीय गोटातून बोलले जात आहे. कर्जतमध्ये झालेल्या गार्डनच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर होते. त्यानंतर त्यांनी खास पोज देऊन फोटोशेषणही केले. त्यामुळे त्यांच्यातील वादाचे मळभ दूर झाले, असा संदेश देण्यात आला.

दक्षिणेतील नेत्यांनी उचलला होता विडा पण...

दक्षिण नगर जिल्ह्यात विखे पाटलांना फिरकूच द्यायचे नाही, असे ठरवित एकेकाळी दक्षिणेतील नेते एक झाले, परंतु मनात ठरविले ते करणार नसेल ते विखे पाटील कसले. त्यांनी सर्वांवर मात करून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (दक्षिण) निवडणूक लढवित डाॅ. सुजय विखे पाटील यांना खासदार केले. त्यासाठी त्यांना पक्षांतर करावे लागले. काॅंग्रेसचा जिल्ह्यातील व राज्यातील चेहरा म्हणून समोर आले असताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पुत्रप्रेमापोटी भाजपची वाट धरली. भाजपमधील काही नेत्यांना त्यांचा प्रवेश मानवला नाही, परंतु श्रेष्ठींपुढे कोणाचे काही चालेना, अशीच काहीशी अवस्था त्या वेळी झाली होती. आता मात्र विखे पाटील यांनी दक्षिणेतील राजकारणावर बऱ्यापैकी जम बसविला आहे. भाजप नेत्यांनाही त्यांच्याशिवाय पर्याय नाही, असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. विखे पाटील यांच्या विरोधात विडा उचललेल्यांनी तो तसाच तोंडात गिळून घेतला, असेच चित्र तयार झाले.

विखे पाटील यांना विरोध करणाऱ्यांमध्ये भाजपचे तत्कालीन मंत्री प्रा. राम शिंदे हेही होते. काही कार्यक्रमांतून विखे पाटील यांना शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या विरोध केला होता, त्याचाच वचपा म्हणून शिंदे यांना मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभवही स्वपक्षीयातील काही विशिष्ट नेत्यांमुळेच झाला, अशी चर्चा सुरू झाली. याबाबत प्रा. शिंदे यांनी श्रेष्ठींकडे तक्रारही केली होती. 

रोहित पवारांचा वारू आता रोखणे अशक्य दिसल्यानंतर प्रा. शिंदे यांनी मात्र विखे पाटील यांच्याशी जुळवून घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कर्जतमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी एकमेकांना पेढे भरवितानाचे छायाचित्र समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले. त्यामुळे त्यांचे मनोमिलन झाले, असेच म्हटले जाते.

कर्जत, जामखेडची नगरपालिकेवर कोण स्वार होणार

कर्जत व जामखेड या नगरपंचायत आपल्याच ताब्यात असाव्यात, यासाठी भाजपचे प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार ताकद लावली आहे. भाजपच्या हातून विधानसभेचे सदस्यत्त्व गेले. आता नगरपंयाती तरी हातात ठेवाव्यात, यासाठी शिंदे यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठीच आता ऐकेकाळी जोरदार विरोध केलेले खासदार विखे पाटील यांच्याशी मनोमिलन घडवून आणण्याचे काम शिंदे यांच्याकडून झाल्याचे बोलले जाते. या घटनेकडे महाराष्ट्रातील धुरिणांचे लक्ष लागले नसेल तर नवलच !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com