नगर : नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व भाजपचे मंत्री शिवाजी कर्डिले यांचे घनिष्ट संबंध असल्याने खडसे यांच्याबरोबर कर्डिलेही राष्ट्रवादीत येतील, अशी चर्चा सुरू होती. त्याबाबत कर्डिले यांनी या संबंधाचे `गुपित` `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केले आहे.
आगामी काळात भाजप सत्तेत येणार आहे. भाजप देशात सर्वात मोठा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील जनतेचे प्रश्न सोडविले जात आहेत. जनतेचे प्रश्न सोडविणे हेच महत्त्वाचे आहे. यापूर्वी जनतेच्या प्रश्नांसाठीच आपण पर्याय निवडले आहेत. त्यामुळे मी इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे कर्डिले यांनी स्पष्ट करून खडसे यांच्यासोबत जाण्याबाबत त्यामागचे कारण स्पष्ट केले.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत राज्यातील काही आमदार जातील, अशी शक्यता काही नेते व्यक्त करीत होते. त्यामध्ये कर्डिले यांचेही नाव घेतले जात होते. या चर्चेला मात्र कर्डिले यांनी वारंवार पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपमध्येच राहणार असून, राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा ही केवळ चर्चाच असल्याचेच त्यांनी विविध ठिकाणी भाषणातून यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
कर्डिले-खडसे हा संबंध कसा जोडला जातो, याबाबत कर्डिले म्हणाले, की त्या वेळी एकनाथ खडसे विरोधीपक्षनेते होते. माझ्यावर एक संकट आले होते. मला खोट्या गुन्ह्यात अडकविले होते. तेव्हा त्यांचे कर्तव्य म्हणून अन्यायाच्या विरोधात खडसे यांनी न्याय देण्याची भूमिका बजावली. त्याच कारणाने त्यांचे आणि माझे जवळचे संबंध झाले, असे राजकीय लोकांना वाटते. परंतु आता ते राष्ट्रवादीत गेले आहेत, त्यामुळे हा विषय तेथेच संपला आहे. आगामी काळात महाराष्ट्रात भाजप सत्तेत येणार आहे. मी राष्ट्रवादीत जाण्याचा संबंध येत नाही, असे सांगून कर्डिले यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
खडसे यांच्याशी आता संबंध नाही
खडसे जोपर्यंत भाजपमध्ये होते, तोपर्यंत नेते म्हणून एकमेकांशी संबंध होते. आता ते राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यामुळे संबंध असण्याचे कारण नाही. साहजिकच काही विरोधी मंडळी माझा संबंध जोडून माझ्या राष्ट्रवादीत जाण्याबाबत अफवा पसरवितात. परंतु त्यात काहीच तथ्य नाही. आगामी काळात भाजपच सत्तेत येणार आहे, असे सांगून कर्डिले यांनी खडसे यांच्याशी संबंधाबाबत स्पष्टता केली. कर्डिले यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमधील नेत्यांच्या पक्षप्रवेशालाही पूर्णविराम मिळणार आहे.

