सत्तारांना मिळाला `आंबा` अन विखे पाटलांना `बाभळ` - The rulers got 'Mango' and Vikhe Patla got 'Babhal' | Politics Marathi News - Sarkarnama

सत्तारांना मिळाला `आंबा` अन विखे पाटलांना `बाभळ`

मुरलीधर कराळे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

नंतर मी ज्या रस्त्याने गेलो, तो रस्ता आंब्याच्या झाडाखाली गेला, अन विखे पाटील ज्या रस्त्याने गेले, तो बाभळीच्या झाडाखाली जाऊन थांबला. आता विखे पाटलांनी आंब्याच्या झाडाखाली यावे.

नगर : ``त्या वेळी काॅंग्रेसमधून आम्ही अनेकजण बाहेर पडलो. इस दिल के टुकडे हुऐ हजार, कोई इधर गिरा, कोई उधर गिरा. मीही विखे पाटलांबरोबर त्या रस्त्याने निघालो होतो. 15 दिवस चाललो. पण रस्त्यातूनच मागे फिरलो. नंतर मी ज्या रस्त्याने गेलो, तो रस्ता आंब्याच्या झाडाखाली गेला, अन विखे पाटील ज्या रस्त्याने गेले, तो बाभळीच्या झाडाखाली जाऊन थांबला. आता विखे पाटलांनी आंब्याच्या झाडाखाली यावे,`` असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना करून राज्यातील राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे.

श्रीरामपूर येथील पंचायत समितीच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त विखे पाटील व मंत्री सत्तार एका व्यासपीठावर होते. दोघेही पूर्वी काॅंग्रेसमध्ये होते. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी पक्षांतर केले. विखे पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला, तर सत्तार यांनी शिवसेनेचा. आता शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे सत्तार यांना मंत्रीपदावर विराजमान होता आले. विखे पाटील यांची मात्र ती संधी हुकली. भाजपची सत्ता असतील, तर विखे पाटील यांनाही मंत्रीपद मिळाले असते. मात्र तसे झाले नाही. असे असले, तरी भाजपचे नेते मात्र `आम्ही पुन्हा सत्तेत येणार` अशी दवंडी पिटवित आहेत. त्यात किती तथ्य आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

तर सत्तार असे बोललेच नसते

सध्या राज्याच्या राजकारणातील महाविकास आघाडी सरकार डिसेंबरपर्य़ंतच टिकेल आणि भाजपची सत्ता येईल, असे भाजपनेते ठामपणे सांगत आहेत. जर हे खरे असते, किंवा त्यासंबंधातील अंतर्गत वेगवान घडामोडी असत्या, तर विखे पाटील यांनीच सत्तार यांना `आमच्याकडे या` असे म्हटले असते. परंतु तसे झाले नाही. सत्तार यांनी विखे पाटील यांनाच शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले. याचाच अर्थ भाजपमध्ये तशा हालचाली नाहीत, असे राजकीय गोटातून चर्चिले जात आहे.

विखे पाटील निमंत्रण स्विकारणार काय

विखे पाटील यांनी सत्तार यांच्या निमंत्रणावर भाष्य करण्याचे टाळले. परंतु `तुम्हीच आमच्याकडे या,` असेही म्हटले नाही. याचाच अर्थ विखे पाटील शिवसेनेत जाण्याबाबत सकारात्मक आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप खिळखिळी करण्याचा शिवसेनेचा हा डाव आहे का, विखे पाटील यांना रोखण्यासाठी भाजपश्रेष्ठी प्रयत्न करतील काय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. विखे कुटुंबिय पूर्वी शिवसेनेत होते. त्यांची शिवसेनेशी नाळ जोडलेले आहे, परंतु ती घट्ट होऊ शकली नाही, हे त्यांच्या वारंवार पक्षांतरावरून दिसून आले. त्यामुळे कट्टर शिवसेना कार्यकर्ते विखे पाटील यांचे शिवसेना आगमन पचवतील का, अशा अनेक प्रश्नांना श्रीरामपूरच्या कार्यक्रमाने जन्म दिला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख