तर साई संस्थानला तालीबानी पुरस्कार देऊ : तृप्ती देसाई - Let's give Taliban award to Sai Sansthan: Trupti Desai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

तर साई संस्थानला तालीबानी पुरस्कार देऊ : तृप्ती देसाई

मुरलीधर कराळे
गुरुवार, 10 डिसेंबर 2020
महिलांचा अपमान करणारी मानसिकता शिर्डीकरांमध्ये आहे. तिच बदलण्याचा मानस आमचा आहे. साई संस्थानचा निर्णय चुकीचा आहे.

नगर : साई संस्थानने फलक लावून एक प्रकारचा फतवा काढला आहे. फतवा तालीबानमध्ये दिला जातो. 31 डिसेंबरपर्यंत हा फतवा हटविला नाही, तर आम्ही पुन्हा आंदोलन करून हा फलक हटवू. तसेच साई संस्थानला तालीबानी पुरस्कार देऊन उपरोधात्मक आंदोलन करू, असा इशारा आज भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी सभ्य वेशभूषेत यावे, असे फलक साई संस्थानने लावले आहेत. त्याविरोधात त्या शिर्डीकडे येत होत्या. देसाई यांना शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी शिर्डीत प्रवेशबंदी केली होती. हा आदेश झुगारून देसाई आज सकाळी पुणे येथून नगर-पुणे महामार्गाने शिर्डीला जाण्यासाठी येत होत्या. त्या विरोधात देसाई आज शिर्डीकडे निघाल्या असता त्यांना पोलिसांनी नगर- पुणे रस्त्यावरील सुपे टोलनाक्‍यावर रोखले. जुजबी कारवाई करून सायंकाळी त्यांना पोलिस संरक्षणात शिरूर हद्दीत सोडण्यात आले. या वेळी देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

देसाई म्हणाल्या, की आज आम्ही शिर्डीला निघालो होतो, परंतु पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. शिर्डीत आमच्या जिवाला धोका आहे, असे सांगून पोलिसांनी आम्हाला अडविले. महिलांचा अपमान करणारी मानसिकता शिर्डीकरांमध्ये आहे. तिच बदलण्याचा मानस आमचा आहे. साई संस्थानचा निर्णय चुकीचा आहे. हा फलक आम्हाला हाती लागू नये म्हणून तो उंचावर घेतल्याचे समजते. उंचावर घेण्यापेक्षा तो काढून घ्यावे, अशी आमची मागणी आहे.

साई संस्थानला इशारा देताना त्या म्हणाल्या, की 31 डिसेंबरपर्यंत फलक हटविला नाही, तर आम्ही पुन्हा येऊ. साई संस्थानची भूमिका अयोग्य आहे. 31 डिसेंबरनंतर आंदोलन करणार आहोत. हा साईसंस्थानचा फतवा आहे. फतवा हा तालीबानमध्ये काढला जातो. साईसंस्थानने हा फतवा हटविला नाही, तर आम्ही साईसंस्थानला तालीबानी पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत, असे देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, तृप्ती देसाई शिर्डी येथे येणार असल्याने, काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील व प्रांजली सोनवणे, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, ज्योती गडकरी यांच्यासह सुपे पोलिसांनी बंदोबस्त दिला होता. या वेळी शिघ्रकृती दल, दंगलनियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख