`निवडणुका बिनविरोध`चा हजारे यांचा सल्ला, मात्र नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी - Hazare's advice of 'election unopposed', but strong front formation of leaders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

`निवडणुका बिनविरोध`चा हजारे यांचा सल्ला, मात्र नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी

मुरलीधर कराळे
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

अण्णांचा सल्ला आमदारांह माजी आमदार विजय औटी यांनीही मानला, तरच पारनेर नगर पंचायतीची निवडणुकही बिनविरोध होईल, मात्र हा सल्ला केवळ नावापुरताच म्हणावा लागेल. पारनेर तालुक्यात नगर पंचायतीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

नगर : निवडणुका बिनविरोध करण्याचा सल्ला नुकताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आमदार निलेश लंके यांना दिला. लंके यांनीही तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जास्तीत जास्त बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले, मात्र लगेचच होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

अण्णांचा सल्ला आमदारांह माजी आमदार विजय औटी यांनीही मानला, तरच  पारनेर नगर पंचायतीची निवडणुकही बिनविरोध होईल, मात्र हा सल्ला केवळ नावापुरताच म्हणावा लागेल. पारनेर तालुक्यात नगर पंचायतीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

गावचा विकास थांबण्यासाठी अंतर्गत वाद कारणीभूत असतात. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावागावात गटबाजी भांडणे वाद होतात व त्यातून भाऊबंदकी सुरू होते. त्यामुळे गावाचा विकास थांबतो, त्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, तर गावाच्या विकासास चालना मिळेल, यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला हजारे यांनी लंके यांना दिला.

पारनेर नगरपंचायतीचे बिगुल वाजले आहे. हजारे यांचा तालुका असलेल्या पारनेरमध्ये निवडणुका जास्तीत जास्त बिनविरोध होतील, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे या नगरपंचायतीत परस्पर विरोधी ठाकलेले राष्ट्रवादीचे आमदार लंके व शिवसेनेचे माजी आमदार औटी हे कट्टर विरोधक होऊन बसले आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस हे दोन्ही पक्ष मित्र पक्ष आहेत. असे असताना पारनेर नगरपंचायतीत या दोन नेत्यांत सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे निवडणुका बिनविरोध करण्याचा सल्ला संपूर्ण देशाला देणाऱ्या हजारे यांचा हा तालुका असल्याने हा दोन नेत्यांतर्गत असलेला विरोध किती टोकाला जाऊ शकतो, हे लवकरच दिसून येणार आहे.

पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी तिसरी आघाडीही जोर धरू लागली आहे. तिला काही अंशी भाजपचे सहकार्य असल्याचे मानले जाते. भाजपकडून या निवडणुकीसाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले या दिग्गजाचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे बिनविरोधचा नारा फोल ठरणार आहे. असे असले, तरी कोविडच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींबरोबरच नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे सर्वसामान्यांचे मत आहे. किमान हजारे यांचे तरी नेत्यांनी ऐकावे, असा सूर कार्यकर्त्यांतून व्यक्त होताना दिसत आहे.

दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या असल्या, तरी त्या जास्तीत जास्त बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा हजारे यांनी केली आहे. त्याच्या हाकेला किती नेते सकारात्मक उत्तर देतात, हे काळच ठरविणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख