काँग्रेसचे प्रभारी लय भारी ! नगरच्या  विनायक देशमुख यांच्या जळगावला तब्बल १२० वाऱ्या !  - Nagar Vinayak Deshmukh congress incharge for Jalgav | Politics Marathi News - Sarkarnama

 काँग्रेसचे प्रभारी लय भारी ! नगरच्या  विनायक देशमुख यांच्या जळगावला तब्बल १२० वाऱ्या ! 

मुरलीधर कराळे : सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 जानेवारी 2018

"दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाैरव म्हणजे माझ्या कामाची खऱ्या अर्थाने मला पावती मिळाली आहे. आगामी काळात जळगाव जिल्ह्यात एक खासदार व पाच आमदार निवडून आणण्याचा मी मेळाव्यात निर्धार केला आहे. त्यासाठी जळगावमधील सर्व नेत्यांचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे आगामी काळात विशेष मोहीम राबवून पक्षसंघटना बळकट करणार आहे ",देशमुख यांनी 'सरकारनामा' शी बोलताना सांगितले.

नगर :  जळगाव जिल्ह्यातील काॅग्रेसच्या बळकटीकरणासाठी नगरचे नेते व पक्षाचे राज्याचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी दीड वर्षांत १२० वेळा वाऱ्या केल्या आहेत. नुकत्याच जळगाव येथे झालेल्या मेळाव्यात देशमुख यांचा दोन माजी मुख्यमंत्र्यांनी गाैरव  केला. या वेळी 'जळगावचे प्रभारी लय भारी 'अशी शाबासकीची थाप त्यांनी दिली.

विनायकराव देशमुख यांचा विशेष सत्कार जळगाव येथील मेळाव्यात नुकताच झाला. दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी आवर्जुन हा गाैरव करीत जळगावमध्ये पक्षबांधणीच्या कामाची पावती दिली. एव्हढेच नव्हे, तीन हजार कार्यकर्त्यांसमोर जळगावचे प्रभारी.. लय भारी.. असा उच्चार दोनदा करीत पृथ्वीराज चव्हाण यांनी देशमुख यांना शाबासकी दिली.

विनायकराव देशमुख यांनी नगर जिल्ह्यातही काॅग्रेस पक्ष बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. जळगावचे प्रभारी म्हणून त्यांनी दीड वर्षांपूर्वी सूत्रे हाती घेतले.या काळात त्यांनी तब्बल १२० वेळा जळगावचा दाैरा करून जुन्या-नव्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. पक्ष संघटना वाढविण्यासाठी जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी आढावा घेतला.

देशमुख यांनी मेळाव्यात बोलताना संघटना बांधणीची चतुसुत्री जाहीर केली. पहिली बाब म्हणजे आंदोलने. पेट्रोल-डिझेल दरवाढ, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न,शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांवर आंदोलने करणार. दुसरी बाब म्हणजे बुथ कमिटी. प्रत्येक बुथवर दहा लोक असतील.

मार्च अखेरपर्यंत ही कमिटी पूर्ण करणार. तिसरी बाब म्हणजे व्यापक जनसंपर्क. याअंतर्गत दोन लोकसभा मतदार संघात आठ-आठ दिवसांची परिवर्तन यात्रा काढणार. रावेर व जळगावमध्ये ही यात्रा निघेल. चाैथी बाब म्हणजे घरवापसी. काॅग्रेसपासून दूर गेलेल्या नेत्यांना भेटून त्यांना परत पक्षात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक नेते काॅंग्रेसमध्ये येणार आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख