Nagar student strands in UP and UP students strands at Nagar | Sarkarnama

नगरमधील 16 विद्यार्थी उत्तर प्रदेशात तर उत्तरप्रदेशातील 23 विद्यार्थी नगरमध्ये अडकले!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

उत्तर प्रदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाने पत्राद्वारे परवानगी मागितली आहे. त्यावर योग्य निर्णय घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
 

नगर : संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील उन्नावच्या नवोदय विद्यालयात गेलेले नगर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 16 तिथे अडकले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 'लॉक डाउन' करण्यात आला असला, तरी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना नगरमध्ये आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील 23 विद्यार्थीही पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात अडकले आहेत. नगरला अडकलेले 23 विद्यार्थी उन्नावला सोडून तेथील 16 विद्यार्थी नगरला आणण्याबाबत नवोदय विद्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत, नगरमधील विद्यार्थ्यांना आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. उत्तर प्रदेशात अडकलेल्या नगरच्या विद्यार्थ्यांमध्ये आठ मुली व आठ मुलांचा समावेश आहे, तर नगरमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशाच्या विद्यार्थ्यांमध्ये पंधरा मुले व आठ मुलींचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर परतण्याची वेळ आली, त्या वेळी संपूर्ण देशात 'लॉक डाउन' करण्यात आले आहे. जाण्या-येण्याचे सर्व मार्ग खुंटल्याने विद्यालयाने पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यामुळे प्रशासनानेही वेळ न दवडता विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे : "साहेब, मुलांना परत आणण्यासाठी शासकीय वाहन पाठविणे शक्‍य नसल्यास सर्व पालक वर्गणी करून खासगी वाहन ठरवतील. तुम्ही फक्त परवानगी द्यावी.'

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख