nagar shivsena leader at matoshri | Sarkarnama

नगरचे शिवसेना नेते 'मातोश्री'वर, 'महापौर' ठरवूनच परत येणार!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

आज दिवसभरात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

नगर: महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शिवसेनेचे नेते मुंबईला दाखल झाले आहेत. आज (शनिवारी) याबाबत चर्चा होऊन महापौर कोणाचा करायचा, याबाबतची भूमिका ठरविण्यात येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीनेही भाजपशी मिलिभगत करीत युती करण्याचे प्रयत्न सुरू असून, भाजपने कोणाबरोबर युती करायची, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. राज्यात भाजप व शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महापालिकेतही भाजप व शिवसेना युतीसाठी एकत्र येईल, अशी आशा भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांना आहे.

चुरशीच्या झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल राजकीय वर्तुळातील सर्व अंदाज चुकवत लागला. शिवसेनेला २४, राष्ट्रवादीला १८, भाजपला १४, काँग्रेस ५, बहुजन समाज पक्ष ४, तर अपक्ष २ व समाजवादी पक्ष १ अशा जागा मिळाल्या. शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे शिवसेना व भाजप यांच्यात समेट घडवून महापौर शिवसेनेचा करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु आहत. त्यासाठी शिवसेनेचे नेते आज मुंबईला मातोश्रीवर दाखल झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून भाजपशी युती करण्याबाबत निर्णय होणार असल्याचे समजते. दरम्यान, शिवसेनेच्या जास्त जागा असल्याने महापौर शिवसेनेचाच करायचा, यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही आहेत. भाजप व शिवसेनेचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेणार असून, आज दिवसभरात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख