यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवातून शंकरराव गडाख यांची विधानसभेची पेरणी

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने चार दिवस सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांनी संपूर्ण जिल्ह्याला राजकारण व समाजकारणाचे एक रुप पहायला मिळत आहे. समाजाप्रती असलेले प्रेम, वेगळे काहीतरी करून दाखविण्याची धमक, आणि आगामी राजकारणासाठी दूरदृष्टीपणा हे सर्व काही या कार्यक्रमातून दिसून येत आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदारसंघात जाऊन वडिलांचे (यशवंतराव गडाख) काम, नवा दृष्टीकोन घराघरांत पोचविला. ही आगामी विधानसभेची पेरणीच समजली जाते.
यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवातून शंकरराव गडाख यांची विधानसभेची पेरणी

नगर : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने चार दिवस सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांनी संपूर्ण जिल्ह्याला राजकारण व समाजकारणाचे एक रुप पहायला मिळत आहे. समाजाप्रती असलेले प्रेम, वेगळे काहीतरी करून दाखविण्याची धमक, आणि आगामी राजकारणासाठी दूरदृष्टीपणा हे सर्व काही या कार्यक्रमातून दिसून येत आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदारसंघात जाऊन वडिलांचे (यशवंतराव गडाख) काम, नवा दृष्टीकोन घराघरांत पोचविला. ही आगामी विधानसभेची पेरणीच समजली जाते.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना मानणारे सर्वच पक्षातील नेते मंडळी आहेत. पक्षीय पातळीवर नव्हे, तर मित्र म्हणून त्यांना इतर पक्षातील नेतेही तितकेच जवळचे आहेत. त्यांचे साहित्यावरील प्रेम त्यांच्या स्वतःच्या लिखाणातून दिसून येते. अमृतमहोत्सवानिमित्त सोनई येथे झालेला हा सामाजिक, राजकीय मेळावा, चार दिवस भरलेला राजकीय यात्रोत्सव जणू सोनईकरांना सोनेरी भेटच आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी मत व्यक्त केले. ग्रामस्थांनीही हा सोहळा अत्यंत प्रेमभावनेने स्विकारला. त्यामुळे सोनई गावात दिवाळी असल्यासारखे वातावरण तयार झाले. प्रत्येकजण नटला. गडाख यांना भेटण्यासाठी येत असलेल्या राज्यभरातील मान्यवरांची मांदियाळी भरली. सर्वच पक्षातील मान्यवर मंडळींनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. कविसंमेलन, कृषीप्रदर्शन, पुस्तकप्रदर्शन, वृक्षलागवड, हिंदी कवी संमेलन, कृतज्ञता पुरस्कार वितरण याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी अशा कार्यक्रमांनी सोनईकरच नव्हे, संपूर्ण नेवासे तालुका भारावला. प्रत्येकाच्या तोंडी यशवंतराव गडाख यांचेच नाव चर्चेत राहिले.

राजकीय मंडळींची हजेरी
गेल्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील बहुतेक सर्वच नेत्यांनी यशवंतराव गडाख यांना भेटून शुभेच्छा दिल्या. राज्यभरातील नेतेसुद्धा येऊन गेले. यशवंतराव गडाख यांचे जुने मित्र आमदार गणपतराव देशमुख आले. त्यावेळी गडाख यांनी त्यांची गळाभेट घेऊन गप्पा मारल्या. राजकारणासह सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रात सा उमटविलेले आमचे सहकारी यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवासाठी आवर्जुन आलो, असे सांगून देशमुख यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आमदार सतेज पाटील यांनी भेट घेऊन आभाळासारखे कर्तुत्त्व काय असते, हे गडाख साहेबांकडे पाहून समजते. त्यांचे कार्य पाहून प्रेरणा मिळते, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

शंकरराव गडाख यांची राजकीय तयारी
नेवासे तालुक्यातील ग्रामपंचायत, सेवा संस्था तसेच इतर अनेक संस्था आपल्या नेतृत्त्वाखाली ठेवण्यात माजी आमदार शंकरराव गडाख यांनी यश मिळविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही आपलेच उमेदवार विजयी होण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. आता वडीलांच्या (यशवंतराव गडाख) अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. प्रत्येक गावात, संस्थांमध्ये, देवस्थानांमधील विश्वस्तांकडे कार्यक्रम पत्रिका व यशवंतराव गडाख यांचा जीवनपरीचय असलेली सीडी पोचविण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे घरोघरी गडाख कुटुंबियांचेच नाव सध्या घेतले जात आहे. त्यानिमित्ताने मतदारांशी थेट चर्चा करण्याची संधी गडाख यांनी सोडली नाही. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चांगली तयारी झाल्याचे लोकांमधून बोलले जात आहे.

क्रांतिकारी शेतकरी पक्षाची धुरा
क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष असलेले शंकरराव गडाख यांनी या पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी असली, तरी ती वरिष्ठ पातळीवर आहे. स्थानिक पातळीवर मतभेद झाले म्हणूनच गडाख यांनी राष्ट्रवादीकडून काडीमोड घेतला होता. त्यामुळे आता क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून गडाख यांची विधानसभेची जोरदार तयारी झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com