पोलीस अधीक्षक 'अॅक्शन मोड'मध्ये; गुन्हेगारी टोळीवर कारवाई - pune rural police takes action against criminal gang under mcoca | Politics Marathi News - Sarkarnama

पोलीस अधीक्षक 'अॅक्शन मोड'मध्ये; गुन्हेगारी टोळीवर कारवाई

प्रफुल्ल भंडारी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. 

दौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई केली आहे. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे अभिनव देशमुख यांनी हाती घेतली असून, गुन्हेगारांवर धडक कारवाईला सुरूवात केली आहे. 

देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण (दोघे रा. बोरावकेनगर, गोपाळवाडी, ता. दौंड), अक्षय कोंडक्या चव्हाण (रा. माळवाडी, लिंगाळी, ता. दौंड), नेपश्या पिराजी काळे (रा. राक्षशवाडी, ता. कर्जत, जि. नगर) व एक विधि संघर्षग्रस्त बालक अशा पाच जणांच्या टोळीवर ही कारवाई करण्यात आली. या टोळीतील सदस्यांचा दरोडा, खून व लूटमारी यासारख्या गुन्ह्यात सहभाग होता. त्यामुळे या सर्व आरोपींना दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झालेली नव्हती. 

लॉकडाउनच्या काळात ३० मार्चला या टोळीने सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) येथे ट्रकचालक काशिनाथ रामभाऊ कदम (वय ५५, रा. ढोकी, जि. उस्मानाबाद) यांचा खून केला होता. तर एका टेम्पो मदतनीसावर चाकूने वार केले होते. या खून व लुटमारीचा तपास दौंड पोलिस व पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तपणे करीत काही आरोपींना अटक केली होती. 

पुण्यातील येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून १६ जुलैला या टोळीतील देवगण चव्हाण, गणेश चव्हाण, अक्षय चव्हाण व अन्य दोन, असे एकूण पाच कैदी खिडकीचे गज उचकटून पळून गेले होते. त्यापैकी गणेश व देवगण चव्हाण यांना पोलिसांनी पकडले. या टोळीतील अक्षय चव्हाण व नेपश्या काळे हे दोन आरोपी फरारी आहेत. आता या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी या गुन्ह्यांच्या दोषारोपपत्रास तात्काळ मंजुरी दिल्याने टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई झाली, अशी माहिती दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.                   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख