"ज्ञानेश्वर' बिनविरोध होण्यासाठी शेवटचा एक तास ठरला महत्त्वाचा

निवडणुकीचे खरे राजकीय नाट्य रंगले ते माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह दोघा समर्थकांच्या दाखल उमेदवारी अर्ज माघारीसाठी. तेही शेवटच्या दिवशी सकाळी दहा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत.
chandrashekhar ghule.jpg
chandrashekhar ghule.jpg

नेवासे : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंची कोणतीच "डिमांड' मान्य न करताही लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. मात्र या निमित्ताने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसभरात अनेकांकडून मुरकुटे यांच्या मनधरणीचे राजकीय प्रयोग रंगले. आणि यात फक्त तासाभरातच ही निवडणूक बिनविरोध करून ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले हेच "बाजीगर' ठरले. "ज्ञानेश्वर'च्या बिनविरोध होण्यामागचे तेच खरे "किंगमेकर' असल्याचे अनेकांनी अनुभवले. 

नेवासे तालुक्‍यातील "ज्ञानेश्वर'ची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी घुले-बंधूंसह त्यांच्या समर्थकांनी प्रयत्न केले. 135 पैकी 111 इच्छुक उमेदवारांनी घुले बंधुंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आपले अर्ज मागे घेतले. मात्र या निवडणुकीचे खरे राजकीय नाट्य रंगले ते माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह दोघा समर्थकांच्या दाखल उमेदवारी अर्ज माघारीसाठी. तेही शेवटच्या दिवशी सकाळी दहा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत. 

"ज्ञानेश्वर'ची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून या दिवशी सकाळपासून सायंकाळी साडेसातपर्यंत मुरकुटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक ऍड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, भाजप नेते विठ्ठल लंघे, सचिन देसरडा आदींनी बंद खोलीत केलेल्या मनधरणीला मुरकुटेंच्या अवास्तव "डिमांड'मुळे यश आले नाही. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता कारखानास्थळी मुरकुटे व चंद्रशेखर घुले यांची बंद खोलीत तब्बल तासभर खलबत सुरू असताना गंभीर चेहरा घेत मुरकुटे तेथून निघून गेले. त्यापाठोपाठ घुलेही बाहेर पडत यंत्रणेला "चिन्हे' वाटप करून घ्या, असे सांगून निघून गेले. 

आता निवडणूक होणार, या विचाराने नेत्यांसह घुले समर्थकही गंभीर झाले होते. मात्र काहीवेळातच चंद्रशेखर घुलेंबरोबर त्यांच्या वाहनात मुरकुटेसमर्थक उमेदवार आला. त्याने आपला मागे घेतला व पुन्हा घुले त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले. या वेळी गंभीर चेहरे थोडे खुलले. मात्र मुरकुटेसह एकच अर्ज बाकी असल्याने बिनविरोध शक्‍य नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच चंद्रशेखर घुले यांचे वाहन पुन्हा जोराने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे आले. सर्वांच्या नजरा त्या वाहनाकडे लागल्या होत्या.

प्रथम घुले उतरले व त्यांच्या पाठोपाठ मुरकुटे व त्यांचा समर्थक उतरल्याने उपस्थित "अवाक'च झाले. या वेळी मुरकुटे आले, त्यांनी समर्थकासह उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि ते निघून गेले. या वेळी "ज्ञानेश्वर'ची होणारी निवडणूक चंद्रशेखर घुले यांच्या अवघ्या तासभराच्या प्रयत्नात बिनविरोध केल्याच्या निमित्ताने चंद्रशेखर घुलेंच्या मुरब्बी व मुसत्सद्दी राजकीय पैलूंचे दर्शन जिल्ह्याला घडले. 

अन्‌ मुरकुटेंचे बंड थंडावले 

घुले-मुरकुटे चर्चेत मुरकुटेंनी इतर अवास्तव "डिमांड'सह ज्ञानेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, ऍड. देसाई देशमुख यांना विरोध दर्शवत या दोन जागेसह वडाळा गट वर स्वत:सह दोघा समर्थकांचा हक्क सांगितला होता. तसेच भाजपांतर्गत स्पर्धक विठ्ठल लंघे यांचा संचालकमध्ये समावेश मुरकुटुंना जिव्हारी लागल्यानेही त्यांनी "ज्ञानेश्वर'च्या निवडणुकीत बिनविरोधसाठी आडकाठी केली होती. मात्र चंद्रशेखर घुलेंनी आपले राजकीय चातुर्य पणाला लावत मुरकुटेंचे वरील नेत्याविरोधातील बंड थंड केले. 
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com